Join us

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:41 AM

एफडीएची मोहीम : ४३ विक्रेत्यांची तपासणी

मुंबई : औषध विक्रेत्याकडून अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषधे विनाप्रिस्क्रिप्शन सर्रासपणे रुग्णास विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाली. यासंदर्भात पडताळणी करून कारवाई करण्याच्या हेतूने जून व जुलै महिन्यात औषध निरीक्षकांनी राज्यातील किरकोळ औषध विक्री दुकानांची तपासणी करण्याची मोहीम राबविली.

तपासणी मोहिमेंतर्गत बृहन्मुंबई विभागामध्ये १३, कोकण विभाग ६, पुणे विभाग ८, नाशिक विभाग ५, औरंगाबाद विभाग ५ आणि नागपूर विभागात ६ अशा एकूण ४३ किरकोळ औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. या वेळी बहुतेक औषध विक्रेत्यांनी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री केल्याचे आढळून आले. यात मुंबई येथील अपोलो फार्मसी, जेनरीको, मेट्रो मेडिकल यांच्या काही दुकानांचा व इतर संस्थांचा समावेश आहे. ज्या विक्रेत्यांनी विनाप्रिस्क्रिप्शन अ‍ॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषधे व इतर औषधे ज्याच्या विक्रीसाठी डॉक्टरची चिठ्ठी असणे आवश्यक आहे, त्याची पडताळणी न करता औषधांची विक्री केली आहे, त्यांच्या विरोधात औषधे वसौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अ‍ॅन्टीबायोटिक औषधे तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर विकण्यात येणारी इतर औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करू नये. अन्यथा एफडीए प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी केले आहे.

अ‍ॅन्टीबायोटिक औषधांच्या अतिवापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व पुढे जाऊन आरोग्याला धोका उद्भवू शकतो. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय अ‍ॅन्टीबायोटिक औषधाचे सेवन करू नये. प्राप्त औषधाचा वापर डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसारच करावा, असे अन्न व औषध प्रशासनाने जनतेस आवाहन केले आहे. ही कारवाई राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल, अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री मदन येरावार, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ. संजीव मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.