Join us

सत्ताधारी-विरोधकांत ईडीच्या कारवाईने राजकीय घमासान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 6:12 AM

आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी, सूडबुद्धीने कारवाई केल्याचा दावा

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालय (इडी)ने सोमवारी धाडी टाकत चौकशीला सुरूवात करताच राज्यातील राजकीय वातावरण तापले. केंद्र सरकार आणि भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तर, काही चुकीचे केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही इथपासून सरनाईक काही साधुसंत नाहीत, असे प्रतिउत्तर भाजपच्या गोटातून दिले गेले.

सरनाईकांच्या घरावरील ईडीच्या कारवाईचे वृत्त झळकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढविला. आम्ही कोणाला शरण जाणार नाही, लढत राहू. सुरूवात त्यांनी केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे. सरनाईक घरात नसताना त्यांच्या घरात धाड टाकली आहे ही नामर्दानगी आहे. भाजपने सरळ लढावे, शिखंडीसारखे ईडी, सीबीआयला पुढे करू नये, असे आव्हान राऊत यांनी दिले. यावर, सरनाईक घरी नव्हते म्हणून राऊत आरोप करत आहेत. मग, कंगना रनौतच्या कार्यालयावर बुलडोझर चालविला तेंव्हा ती घरात होती का, असा सवाल करतानाच एक महिला घरी नसताना, नोटीस न देता केलेल्या कारवाईत मर्दानगी होती का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.  

‘विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सत्तेचा वापर’ 

सत्तेचा वापर विनम्रपणे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, मात्र केंद्रातले सरकार विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सत्तेचा वापर करत आहे, असा आरोप   राष्ट्रवादी कॉंग्रेसचग अध्यक्ष शरद पवार यांनी केला.  महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आले. सरकार मजबूत आहे. त्यामुळे येणारी अस्वस्थता भाजप नेत्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यातूनच त्यांनी केंद्रातल्या सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे. ईडीची चौकशी हा त्याचाच एक भाग आहे असेही पवार यावेळी म्हणाले. रावसाहेब दानवे यांना आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारे नेते समजत होतो. मात्र हल्ली ते ज्योतिष सांगतात हे देखील आपल्याला कळाले. अशा कुडमुड्या ज्योतिषांवर आपण विश्वास ठेवत नाही. तुम्ही देखील त्याकडे लक्ष देऊ नका, असा टोलाही पवार यांनी दानवे यांना लगावला. 

सरनाईक काही साधुसंत नाहीत :  राणेप्रताप सरनाईक काय साधुसंत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी कणकवली येथे दिली. 

राऊत यांना जाऊन भेटले प्रताप सरनाईक 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक स्वत: परदेशात असल्याचे वृत्तही दुपारी पसरले. प्रत्यक्षात ते मुंबईतच होते आणि ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन खा. संजय राऊत यांना भेटले. त्यांनी दीड तास चर्चा केली. दोघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरनाईक म्हणाले,  ईडीने कशासाठी छापे टाकले याची मला माहिती नाही. आपण न्यायालयात दाद मागू. 

माहिती घेतल्यानंतर शिवसेनेची भूमिका

शिवसेना नेते, अनिल परब यांनी मात्र कारवाईबाबत संपूर्ण माहिती घेतल्यावरच पक्षाची भूमिका मांडली जाईल, असे स्पष्ट केले. तर, सहा वर्षांत भाजप नेत्यावर ईडी, सीबीआयची कारवाई झाली का, विरोधी पक्षाची सरकार असतात तिथेच कारवाई का, असा प्रश्न करतानाच ही कारवाई महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.  

टॅग्स :मुंबईशिवसेना