१४६ गुन्हे नोंद, ७३ आरोपींना अटक
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य उत्पादन व अवैध मद्य विक्री प्रकरणी सोमवारी एका दिवसात राज्यात १४६ गुन्हे नोंदवले. त्यामध्ये ७३ आरोपींना अटक करण्यात आली तर १७ वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत ४४ लाख ५२ हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ मार्च ते १३ एप्रिल पर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २५९३ गुन्हे नोंदविण्यात आले असून १०४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. १४३ वाहने जप्त करण्यात आली असून ६ कोटी ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती संचालक (दक्षता व अंमलबजावणी) उषा वर्मा यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री शंभूराजे देसाई, आयुक्त कांतीलाल उमाप यांनी विभागातील अधीक्षकांना केलेल्या आवाहनानुसार या विभागातील विविध अधीक्षकांनी त्यांच्या जिल्ह्यातील अनाथ मुले, भिक्षुक, गरीब, मजूर, बेघरांना रेशन/ अत्यावशक खाद्यपदार्थांच्या किट्स चे वाटप केले. तसेच अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत असलेल्या पोलीस, अन्न वितरण, कोषागार, दुग्धशाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच नगरपरिषद सफाई विभाग इत्यादी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सॅनीटायझर आणि मास्क यांचे वाटप केले. नागपूर, नांदेड, औरंगाबाद, यवतमाळ, पुणे आणि उस्मानाबाद येथील अधिक्षकांनी हे वाटप केले.