Join us  

औषधांच्या दुकानांवर ‘एफडीए’ची कारवाई

By admin | Published: April 23, 2016 2:26 AM

औषधाच्या दुकानांत फार्मासिस्ट नसल्यास औषधे विक्री करू नये, असा नियम राज्यात लागू करण्यात आला आहे. असे असतानाही अंधेरी पूर्व भागातील दोन औषधांच्या दुकानांत

मुंबई : औषधाच्या दुकानांत फार्मासिस्ट नसल्यास औषधे विक्री करू नये, असा नियम राज्यात लागू करण्यात आला आहे. असे असतानाही अंधेरी पूर्व भागातील दोन औषधांच्या दुकानांत रात्री फार्मासिस्टशिवाय औषध विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) मिळाली होती. त्यानुसार २० एप्रिलच्या मध्यरात्री तपासणी करून दोन औषधांची दुकाने बंद करण्यात आल्याची माहिती ‘एफडीए’चे साहाय्यक आयुक्त (औषधे) बी. आर. मासळ यांनी दिली. चुकीची औषधे दिल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. राज्यात अशी काही प्रकरणे झाली आहेत. त्यानंतर एफडीएने प्रत्येक औषधाच्या दुकानात फार्मासिस्ट असणे आवश्यक असल्याचा नियम लागू केला आहे. पण अंधेरी पूर्व परिसरात रात्री उशिरापर्यंत अथवा रात्रभर चालणाऱ्या औषधांच्या दुकानांत फार्मासिस्ट नसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २० एप्रिलच्या मध्यरात्री ११ औषधांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यात शाश्री औषधांचे दुकान, शांती औषधांचे आणि जनरल स्टोअर्स या दोन औषधांच्या दुकानांत फार्मासिस्ट नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोन्ही दुकानांमध्ये औषध विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या दुकानदारांनी फार्मासिस्टची तपशीलवार माहिती दिल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मासळ यांनी दिली. रुग्णांचे हित लक्षात घेऊन यापुढेही औषधांच्या दुकानांवर अशा प्रकारे धडक कारवाई केली जाणार असल्याचेही मासळ यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)