Join us

एफडीएची ८९ खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Published: July 03, 2015 2:13 AM

रस्त्यावर विकले जाणारे गरमागरम, खमंग खाद्यपदार्थ लोक आवडीने खातात. हे चविष्ट पदार्थ आरोग्यास मात्र हानिकारक असतात. ते कशा पद्धतीने, कोणत्या परिस्थितीत तयार केले जातात,

मुंबई : रस्त्यावर विकले जाणारे गरमागरम, खमंग खाद्यपदार्थ लोक आवडीने खातात. हे चविष्ट पदार्थ आरोग्यास मात्र हानिकारक असतात. ते कशा पद्धतीने, कोणत्या परिस्थितीत तयार केले जातात, याविषयी ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अंधेरी आणि दादर भागात तपासणी करून तब्बल ८९ खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या विक्रेत्यांकडून १ लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. पावसाळ्यात गरमागरम भजी, वडापाव, चहा-कॉफी आणि इतर पदार्थांवर लोक ताव मारतात. रस्त्यावरच तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर अनेकदा घाणीतल्या माशा बसतात. आजूबाजूला कचरा पडलेला असतो, पाणी साचलेले असते. ताटल्या, वाट्या स्वच्छ धुतलेल्या नसतात. या सगळ्या परिस्थितीची जाणीव कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांनाच असते. तरीही अशाच परिस्थितीत लोक ते खातात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. पोटदुखी, पोटात संसर्ग होणे, उलट्या, जुलाब असे प्राथमिक त्रास लोकांना होतात. दादर आणि अंधेरी या मुंबईतील गजबजलेल्या भागात वेगवेगळ्या स्तरातील लोकांची नेहमीच ये-जा असते. यामुळे येथेही मोठ्या संख्येने रस्त्यावर खाद्यपदार्थ विकण्यात येतात. खाद्यपदार्थ विक्रेते रस्त्यावर अन्नपदार्थ विकताना एफडीएची मार्गदर्शक तत्त्वे पायदळी तुडवतात. याच बाबी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेकमधून समोर आणल्या होत्या.रिअ‍ॅलिटी चेकनंतर एफडीएने दादरमधील ३२ तर अंधेरीतील ५७ खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली. दादरमधील विक्रेत्यांकडून २५ हजार तर अंधेरी येथील विक्रेत्यांकडून ९८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. या विक्रेत्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे. पुढच्या काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असे डॉ. कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)