FDI ची कारवाई : सेन्सोडाइन, कोलगेट कंपनीने ग्राहकांची दिशाभूल केल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:19 AM2019-04-04T05:19:17+5:302019-04-04T05:19:51+5:30
सौंदर्यप्रसाधन कंपन्यांकडून पावणेपाच कोटींचा साठा जप्त
मुंबई : सौंदर्य प्रसाधनाच्या लेबलवर ग्राहकांची दिशाभूल करणारा दावा उत्पादन कंपन्यांनी नमूद करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु मे. ग्लॅक्सो स्मिथलाइन कन्झ्युमर हेल्थ लिमिटेड कंपनीच्या सेन्सोडाइन आणि मे. कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेडच्या कोलगेट उत्पादनांवर दिशाभूल करणारा दावा छापण्यात आला होता. यावर एफडीएने कारवाई करून सुमारे चार कोटी ६९ लाख ३० हजार ७६८ रुपयांचा साठा जप्त केला आहे.
रिपेअर अॅण्ड प्रोटेक्ट, क्लीनिकली प्रोव्हेन रिलीफ अॅण्ड डेली प्रोटेक्शन फॉर सेन्सिटिव्ह टिथ आणि २४/७ सेन्सिटिव्हीटी प्रोटेक्शन/ क्लीनिकली प्रोव्हेन रिलीफ असा दावा दोन्ही कंपन्यांनी सौंदर्य प्रसाधनांवर छापून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. भिवंडीतील कारवाईवेळी मे. ग्लॅक्सो स्मिथलाइन कन्झ्युमर हेल्थ लिमिटेड कंपनीकडे सेन्सोडाइन विथ फ्लोराईड टूथपेस्ट, सेन्सोडाइन फ्लोराईड टूथपेस्ट आणि फ्रेश जेल या उत्पादनांचा साठा आढळून आला. या वेळी चार कोटी २७ लाख ४४ हजार ७६२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच मे. कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीकडे कोलगेट अॅण्टीकॅव्हिटी टूथपेस्ट, सेन्सिटिव्ह या उत्पादनाचा साठा आढळून आला. या वेळी ४१ लाख ८६ हजार ००६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियमांतर्गत कलम १८(ए)(२) आणि कलम १७-सी (सी)चे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यासंदर्भात म्हणाल्या की, एफडीएने चांगली कारवाई केली असून उत्पादकांवर चुकीचा दावा करू नये. दाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसलेले मजकूर छापणे गैर आहे. औषध व सौंदर्य कायद्याची मान्यता मिळाल्यावर एखाद्या उत्पादकावर दावा करता येतो. परंतु कारवाई केलेल्या उत्पादकांवर औषध व सौंदर्य कायद्याची मान्यता नसतानाही दावा केलेला आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन सदैव तत्पर
असते.
परवाना असला तरी दावा दिशाभूल करणारा
सौंदर्य प्रसाधनावर आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. सेन्सोडाइन आणि कोलगेट या कंपन्यांकडे सौंदर्य प्रसाधनांचा परवाना आहे. परंतु त्यांनी जे दिशाभूल करणारे दावे केले आहेत त्यानुसार एफडीएने त्यांच्यावर कारवाई केली. पुढील चौकशी सुरू आहे.
- विराज पौनिकर, सहआयुक्त (औषध विभाग),
अन्न व औषध प्रशासन, ठाणे