Join us

छापल्यापेक्षा जास्त दराने वस्तू विकल्यास कारवाई, वैध मापनशास्त्र विभाग सज्ज

By मनीषा म्हात्रे | Published: March 20, 2023 11:26 AM

गेल्या वर्षभरात छापील किमतीपेक्षा जास्त दर आकरणाऱ्या ४९१ जणांवर कारवाई केली आहे.

मुंबई : तुम्ही छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू, खाद्यपदार्थ किंवा अन्य कुठल्याही पदार्थाची विक्री करत असाल तर सावधान. वैध मापनशास्त्र विभागाकडून अशा आस्थापनांवर कारवाईचा वेग वाढला आहे. तपास पथक ग्राहक बनून दुकानात जात पाहणी करत असून गेल्या वर्षभरात ४९१ जणांवर कारवाई केली आहे. त्यामुळे तुमच्या दुकानात येणारी व्यक्ती तपास अधिकारी निघाल्यास तुम्हाला महागात पडू शकते.

घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईत आपण खरेदी करत असलेली प्रत्येक वस्तू, पदार्थ योग्य वजन-मापात आहे की नाही? हे पाहण्यास कुणालाही वेळ नसतो. त्यात, अनेकदा विविध सेवांच्या नावाखाली वस्तू ही छापील किमतीपेक्षा जास्त पैसे आकारून विकली जाते. ग्राहकही त्यावर विश्वास ठेवून जास्त पैसे मोजतो. मात्र, ग्राहकांनी वेळीच सावध होत अशाप्रकारे कुणालाही जास्त पैसे देऊ नये, असे आवाहन वैध मापनशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे.

दुसरीकडे, ग्राहकांच्या अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी वैध मापनशास्त्र विभागाच्या पथकाकडून होणाऱ्या कारवाईचा वेग वाढत आहे. गेल्या वर्षभरात छापील किमतीपेक्षा जास्त दर आकरणाऱ्या ४९१ जणांवर कारवाई केली आहे. तर, शॉर्ट डिलिव्हरीप्रकरणी २,०२३ आणि मापात पाप तसेच अन्य तक्रारींबाबत ८ हजार २९७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा जास्त फटका बसताना दिसतो. एकाच व्यक्तीला कानाकोपाऱ्यात वसलेल्या खेड्यापाड्यात दमछाक करत कारवाईसाठी जावे लागते. 

कर्मचाऱ्यांसाठी ६० चा पॅटर्न...मापात पाप करणाऱ्यावर कारवाई करणाऱ्या महत्त्वाच्या अशा वैध मापनशास्त्र विभागात १९६०-६५ प्रमाणेच मनुष्यबळाची रचना असल्यामुळे एका कर्मचाऱ्यावर जवळपास तीन ते साडेतीन हजार ट्रेडर्सची जबाबदारी आहे. कालांतराने वाढत असलेल्या ट्रेडर्सच्या साखळीवर वचक ठेवण्यासाठी याचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मुंबईत चार विभाग...    व्यापाऱ्यांनी वापरलेले व्यावसायिक वजन किंवा माप कामकाजाच्या मानकांसह पडताळले जाते.    मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक स्तरावर याची पडताळणी होते. मुंबईत चार विभागांमध्ये याचे कामकाज चालते.

जनजागृतीवर भर...पेट्रोल पंप, साखर कारखाने, स्वीट्स, ज्वेलरी, मॉल, स्टेशनरी, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या ठिकाणी वैध मापनशास्त्र विभागाकडून विविध जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेत.

येथे करा तक्रार..ग्राहकांनी तक्रारीसाठी ०२२-२२६२२०२२, व्हॉट्सॲप क्रमांक ९८६९६९१६६६  या क्रमांकावर थेट तक्रार करण्याचे आवाहनही वैध मापनशास्त्र विभागाने केले आहे.

पाण्याच्या बाटलीपासून खरेदी करण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रमाण, किंमत, पॅकेजिंग योग्य आहे की नाही ? हे पाहण्याचा ग्राहकांचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची पडताळणी करूनच खरेदी करा. तसेच, सर्व आस्थापनांवर आमचे लक्ष असून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये, विक्रेत्यासह संबंधित ब्रॅण्डवरही कारवाई होत आहे. - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नियंत्रक, अपर पोलिस महासंचालक, वैध मापनशास्त्र, महाराष्ट्र

टॅग्स :मुंबई