Join us

आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाई, टीसकडून विद्यार्थ्यांसाठी नवा ऑनर कोड जारी; वादाला तोंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 8:28 AM

टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीस) नव्या ‘ऑनर कोड’मुळे पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. नव्या नियमानुसार आंदोलनात भाग घेण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव करण्यात आला असून, देशविरोधी चर्चांमध्ये सहभाग घेतल्यास कठोर कारवाईसह कॉलेजमधून हकालपट्टीही केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 मुंबई - टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीस) नव्या ‘ऑनर कोड’मुळे पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. नव्या नियमानुसार आंदोलनात भाग घेण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव करण्यात आला असून, देशविरोधी चर्चांमध्ये सहभाग घेतल्यास कठोर कारवाईसह कॉलेजमधून हकालपट्टीही केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

राजकीय, व्यवस्थाविरोधी, तसेच धरणे आंदोलन आदींमध्ये सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, या नव्या कोडबाबत विद्यार्थ्यांकडून विरोध केला जात असून हा विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा नवा प्रकार आहे, असा आरोप केला जात आहे.

विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हे कोड आणले असून त्याला कोणताही संविधानिक आधार नाही. कोर्टात हे कोड टिकणार नाहीत. कोणत्या आधारावर चर्चा देशभक्तीची आहे की नाही हे ठरविले जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोड लागू करण्याचा संस्थेला अधिकार नाही, असेही मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.  

बंदीनंतर आता ‘कोड’ चर्चेतटीसने काही महिन्यांपूर्वी पीएसएफ संस्थेशी संलग्न रामदास प्रिनी या विद्यार्थ्याला निलंबित केले होते. त्यासाठी जुन्या कोडचा आधार घेण्यात आला होता. त्याला संबंधित विद्यार्थ्याने यापूर्वीच न्यायलयात आव्हान देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच पीएसएफ या विद्यार्थी संघटनेवरील बंदीच्या टीसच्या निर्णयावर गदारोळ झाला होता. आता नव्या ऑनर कोडमुळे संस्था प्रशासनाला पुन्हा टीकेला सामोरे जावे लागत आहे.