थेट बोर्डाच्या परीक्षांसाठीच बोलवा : महापालिका शिक्षण विभागाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून अधिकृत निर्देश येत नाहीत तोपर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, अशा सूचना पालिका शिक्षण विभागाकडून पुन्हा १५ मार्च रोजी जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करून शाळा किंवा महाविद्यालये विविध कारणांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा, संस्थांवर व सदर मुख्याध्यापकांवर कारवाई होईल, असे पालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
राज्यात अनेक जिल्ह्यांत शाळा सुरू असल्या तरी मुंबईत अद्याप शाळा सुरू करण्यास कोणत्याच बोर्डांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, राज्य बोर्डाच्या तसेच इतर बोर्डाच्या नियोजित आणि जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार परीक्षांसाठी महानगरपालिका शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या शहरांत पुन्हा वाढत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या सूचना देऊनही अनेक शाळा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनासाठी पेपर सबमिट करणे, अकॅडेमिक ॲक्टिव्हिटीज् करणे इत्यादी कारणांसाठी शाळांमध्ये बोलावत असल्याच्या तक्रारी पालकांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत. कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असताना हे प्रकार गंभीर असल्याचे मत महापालिका शिक्षण विभागाने नोंदविले असून, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व बोर्डांच्या शाळांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
* दहावी-बारावी प्रात्यक्षिकांबद्दल संभ्रम
सद्य:स्थितीत राज्यासह मुंबई व उपनगरांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा नियोजनासंदर्भात पालक व विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शाळांना सद्य:स्थितीत शक्य नसल्यास लेखी परीक्षेनंतरही शाळा प्रात्यक्षिकांचे आयोजन करू शकतील, अशी मुभा शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे. मात्र, यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जारी करणे अपेक्षित असल्याचे म्हणणे शाळांनी मांडले.
..................