मुंबई : म्हाडाच्या धारावी येथील संक्रमण शिबिरांत होणाऱ्या घुसखोरीला ‘लोकमत रिअॅलिटी चेक’च्या माध्यमातून वाचा फोडल्यानंतर म्हाडा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. संक्रमण शिबिरातील घुसखोरांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.लाखे यांनी सांगितले की, संक्रमण शिबिरात सुरू असलेल्या घुसखोरीचे भीषण वास्तव प्रशासनाच्या ध्यानात आले आहे. ‘लोकमत’ने वाचा फोडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. येत्या दोन दिवसांत घुसखोरांवर निष्कासन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय संक्रमण शिबिराबाबत घुसखोरीच्या तक्रारी असलेल्या लोकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.याआधी ‘म्हाडाच्या संक्रमण शिबिरांना दलालांचा विळखा’ या वृत्ताद्वारे ‘लोकमत’ने संक्रमण शिबिरातील घुसखोरी उघडकीस आणली होती. कशाप्रकारे तोतया भाडेकरूंना घुसवून दलाल संक्रमण शिबिरांचा ताबा घेत आहेत, हे लोकमत प्रतिनिधींनी पुराव्यानिशी समोर आणले. त्याचा फटकाही पात्र भाडेकरूंना कसा सोसावा लागत आहे, हेसुद्धा त्यामुळे निदर्शनास आले होते. संक्रमण शिबिरातील निवासी गाळे विकले जात असल्यासंदर्भातही लाखे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा प्रकारचे गाळे खरेदी न करण्याचे आवाहन करत दलालांची माहिती असलेल्या लोकांनी तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दोषी आढळणाऱ्या दलाल आणि अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहे.अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?च्म्हाडाने घुसखोरांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे, त्यांच्यावर म्हाडा काय कारवाई करणार, असा सवाल पात्र भाडेकरूंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे घुसखोरांवर कारवाई करताना संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? आणि दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? हा सवाल उपस्थित झाला आहे.‘त्या’ भाडेकरूला मिळणार हक्काचे घरविक्रोळी कन्नमवार नगरमधील गाळा धोकादायक असल्याने धारावी येथे पर्यायी गाळा मिळालेल्या राजेंद्र भांबीड यांना हक्काचे घर मिळवून देण्याचे आश्वासनही म्हाडाने दिले आहे. भांबीड यांच्या नावाने वितरित झालेल्या गाळ्यात घुसखोरी झाल्याच्या प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. त्यानंतर घुसखोरांना निष्कासित करून कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर भांबीड यांना गाळा देण्याची ग्वाही म्हाडाने दिली आहे.
दोन दिवसांत घुसखोरांवर कारवाई
By admin | Published: May 26, 2015 12:42 AM