अनियमित व बेकायदा बांधकामांवर कारवाई
By admin | Published: October 2, 2016 01:47 AM2016-10-02T01:47:38+5:302016-10-02T01:47:38+5:30
स्वत: बेकायदा बांधकामे करून पालिकेची बदनामी करणाऱ्या हास्यअभिनेता कपिल शर्मा प्रकरणानंतर प्रशासनाने कानाला खडा लावला आहे. मंजूर चटईक्षेत्रातील अनियमितता
मुंबई : स्वत: बेकायदा बांधकामे करून पालिकेची बदनामी करणाऱ्या हास्यअभिनेता कपिल शर्मा प्रकरणानंतर प्रशासनाने कानाला खडा लावला आहे. मंजूर चटईक्षेत्रातील अनियमितता आणि बेकायदा फेरबदल करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे संकेत आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. अशा बेकायदा बदल व वापरांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घ्या, त्यानुसार कारवाई करा अशी ताकीद त्यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिली.
दर महिन्याला कारवाईचे ‘टार्गेट’ सर्व विभागांपुढे ठेवण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन खात्याला देण्यात आले आहेत.
कॉमेडियन कपिल शर्माने पालिका अधिकारी लाचखोर असल्याचा आरोप टिष्ट्वटरवर तीन आठवड्यांपूर्वी केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटून पालिकेची प्रतिमा डागाळली होती. मात्र अनेकवेळा विचारणा करूनही त्याच्याकडून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव कपिलने अद्याप जाहीर केले नाही. उलट त्याचे वर्सोवा येथील बंगल्याचे बांधकाम खारफुटींवर तर गोरेगाव येथील त्याच्या सदनिकेमध्ये बेकायदा बदल केले असल्याचे उजेडात आले. त्याबाबत त्याच्यावर पालिकेने नियमानुसार व पोलिसांच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे.
कपिलच्या टिष्ट्वटनंतर तत्काळ कार्यवाही सुरू केल्याने पालिकेवर टीकाही झाली. त्यामुळे यापुढे प्रत्येक तक्रारीची लगेच दखल घ्या, असे आयुक्तांनी आज अधिकाऱ्यांना मासिक आढावा बैठकीत बजावले आहे. सर्वप्रथम व्यावसायिक जागांमधील चटईक्षेत्रातील अनियमिततेवर कारवाईला सुरुवात होईल.
त्यानंतर निवासी क्षेत्रातील अनियमिततेवर कारवाई केली जाणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत बदल, फेरफार यावर कारवाई होणार आहे. (प्रतिनिधी)
तक्रारींची दखल घेण्याचे आदेश
पालिकेकडे अनियमित बांधकामाच्या अनेक तक्रारी येत असतात; मात्र या तक्रारींची दखल घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
परंतु यावर आता सर्वांचेच लक्ष असल्याने तक्रारींची दखल घेणे पालिकेला भाग पडणार आहे. सर्व विभागांना तसे दर महिन्याचे लक्ष्यच आयुक्तांनी दिले आहे.