लेडिज बारवरील कारवाई थंडावली; स्थायीत गोंधळ

By admin | Published: July 29, 2014 12:21 AM2014-07-29T00:21:48+5:302014-07-29T00:21:48+5:30

शहरातील १२ लेडिज सर्व्हिस बारचालक न्यायालयात गेले असून उर्वरित बारवरील कारवाई का थांबली,

Action on Ladies Bar stalled; Fixed confusion | लेडिज बारवरील कारवाई थंडावली; स्थायीत गोंधळ

लेडिज बारवरील कारवाई थंडावली; स्थायीत गोंधळ

Next

ठाणे : शहरातील १२ लेडिज सर्व्हिस बारचालक न्यायालयात गेले असून उर्वरित बारवरील कारवाई का थांबली, याबाबत पालिका अधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्याचे पाहून सदस्यांनी प्रशासनावर आगपाखड करून कारवाई का थांबली, असा सवाल केला. आयुक्तांचे निर्देश असतानाही कारवाई न केल्याने अखेर दोन तासांच्या चर्चेनंतर सभापती सुधाकर चव्हाण यांनी यापुढे संबंधित बारवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करताना त्यांचे पाणी कनेक्शनही तोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
स्थायी समितीची सभा सुरू होताच सदस्य नारायण पवार यांनी या मुद्द्याला हात घालून अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईचा आढावा मागतानाच बारवरील कारवाईचा अहवाल प्रशासनाकडे मागितला. ठाणे महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने १५ जुलैपासून शहरातील लेडिज सर्व्हिस बारमधील अनधिकृत वाढीव बांधकामावर कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत १३ बारवर कारवाई केली असून, त्यातील २ बार जमीनदोस्त करण्यात आले आहेत. १२ बारवाले न्यायालयात गेले असल्याने त्यांच्यावरील कारवाई थांबली असल्याचे अतिक्रमण उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी स्पष्ट केले. परंतु, उर्वरित बारवरील कारवाई का थांबली, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. त्यावरसुद्धा स्थगिती येण्याच्या आदेशाची वाट पाहता का, असा सवाल नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे ज्या बारवर आतापर्यंत कारवाई केली आहे, त्यातील काही बारचे बांधकाम पुन्हा सुरू झाले असल्याचा व्हिडीओ चित्रीकरणाचा पुरावाच पवार यांनी सभागृहात सादर केला.
जे १२ बारमालक कोर्टात गेले आहेत, ते सोडून इतर बारवरदेखील कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक होते का, अशी कोर्टाची आॅर्डर होती का? असेल तर ती सभागृहासमोर सादर करा, अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. तसेच आयुक्तांच्या निर्देशानुसार या बारवर कारवाई करून त्यांच्यावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करताना त्यांचे पाणी कनेक्शनही तोडावे, असे स्पष्ट केले असताना अद्याप त्यानुसार कारवाई झालेलीच नसल्याचे या वेळी उघड झाले. दरम्यान, या बारवर कारवाईचे आश्वासन निपुर्ते यांनी दिले असताना अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी ड्यू प्रोसेस आॅफ लॉनुसार कारवाई करता येते का, हे तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितल्याने सदस्य आणखीनच आक्रमक झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Action on Ladies Bar stalled; Fixed confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.