ठाणे वनविभागाची मुंबईत कारवाई
By admin | Published: January 5, 2017 05:42 AM2017-01-05T05:42:29+5:302017-01-05T05:42:29+5:30
स्टार टर्टल आणि पाँन्ड टर्टल या दुर्मिळ जातीच्या कासवांची काळी जादू तसेच वास्तूदोष निवारणासाठी उपयोग करण्याच्या नावाखाली तस्करी करणाऱ्या मिकाईल खाँ
ठाणे : स्टार टर्टल आणि पाँन्ड टर्टल या दुर्मिळ जातीच्या कासवांची काळी जादू तसेच वास्तूदोष निवारणासाठी उपयोग करण्याच्या नावाखाली तस्करी करणाऱ्या मिकाईल खाँ (२६, मुंबई), संदीप मोरे (३०, रा. कराड) आणि महमद फयाज (३०, मुंबई) तिघांना ठाण्याच्या वनविभागाने मुंबईतून अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ स्टार टर्टल (स्टार कासव), सहा पाँड टर्टल (तळ्यातील कासव) आणि १६ पहाडी तर पाच भारतीय पोपट हस्तगत केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सर्व प्राण्यांची मोठ्या किंमतीमध्ये विक्री केली जाते.
काळी जादू आणि वास्तू दोष निवारण्यासाठी घरात स्टार किंवा पाँड कासव ठेवल्यास लाभ होतो, अशी जाहिरात करुन त्यांची मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये चढ्या भावाने विक्री होत असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली होती.
तिच्या आधारावर ठाणे वनविभाग,मुंबईच्या प्लान्ट अॅन्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि केंद्रीय वन्य जीव गुन्हे नियंत्रण कक्ष यांनी संयुक्तरित्या बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास ही कारवाई केली. ठाण्याचे उपवनसंरक्षक के. डी. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे वनक्षेत्रपाल एस. एस. कंक, प्लान्ट अॅन्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनिश सुब्रमण्यम, अंधरीचे वनपाल रमेश ढमाले, वनपाल समीर इनामदार, मस्जिद बंदरचे वनपाल दिलीप देशमुख आणि कुलाब्याचे वनसंरक्षक सुनिल लोकरे आदींच्या पथकाने या दुर्मिळ कासव खरेदी करण्यासाठी बनावट गिऱ्हाईक पाठवून या तिघांना अटक केली.
वनविभागाने ताब्यात घेतलेल्या या सर्व प्राण्यांची एक लाख ६० हजारांमध्ये विक्री केली जाणार होती. मात्र, तत्पूर्वीच वनविभागाने ही कारवाई केल्याचे एस. एस. कंक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
स्टार टर्टल बाळगणे किंवा त्यांची विक्री करणे हे वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेकायदेशीर असून तो अजामीनपात्र गुन्हा असल्याचेही
कंक यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
कासवाबद्दलचे गैरसमज
टर्टल किंवा पाँड या प्रकारातील कासव ज्यांच्या घरात आहे, त्यांच्याकडे पैशांची बरकत येते. घराच्या कोपऱ्यात ठेवल्यावर भरभराट होते. समृद्धी येते, अशी धारणा असल्यामुळे आंतरराष्ंट्रीय बाजारपेठेत ते मोठया किंमतीना विकले जाते. गुरुवारी मुंबईत पकडलेल्या टर्टलची एक जोडी
१५०० रुपयांना खरेदी करण्यात आली होती.