- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - वर्गणीची रक्कम कमी करायला सांगितल्याच्या रागात सार्वजनिक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका गॅरेज चालकाला ३१ ऑगस्टच्या रात्री बेदम मारहाण केली. मालवणी पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना गॅरेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
तक्रारदार हंसाराम (४९) हे मालवणी चर्च या ठिकाणी गेल्या १४ वर्षांपासून गुगल नावाचे गॅरेज चालवतात. ३१ ऑगस्टला मालवणी गाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे काही कार्यकर्ते वर्गणी गोळा करण्यासाठी गेले. त्यांनी हंसाराम यांना काही दिवसांपूर्वी जबरदस्ती तीन हजारांच्या वर्गणीची पावती दिली होती. नंतर ही रक्कम अडीच हजार रुपये करण्यात आली. हंसाराम यांनी वर्गणी कमी करण्याची विनंती करत दीड हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यातून कार्यकर्त्यांशी वाद झाला. तेव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थेट शिवीगाळ करत मारहाण केली. माझे मूल आजारी आहे आणि नुकताच मी गावी जाऊन आलो. त्यामुळे मला इतके पैसे देणे शक्य नव्हते त्यासाठी मी कार्यकर्त्यांना दीड हजार माझ्या स्वखुशीने देत असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी शिव्या घातल्या आणि मारले. दुसऱ्या दिवशी त्यांनी माफी मागितली म्हणून मी पोलिसात तक्रार दिली नाही, असे हंसाराम यांनी सांगितले.
मालवणी पोलिसांच्या हद्दीत जवळपास १५६ गणेशोत्सव मंडळे आहेत. त्या सर्वांना आम्ही सूचना देत वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती केल्यास आम्ही गुन्हे दाखल करणार असे बजावले आहे. तक्रार आल्यास संबंधितांवर कायद्याचा बडगा उगारण्यात येईल. - चिमाजी आढाव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मालवणी पोलिस ठाणे