Join us

नियमबाह्य स्कूलव्हॅनवर कारवाई सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 4:26 AM

शहर-उपनगरांसह राज्यात नियमबाह्य स्कूलव्हॅनवर कारवाई सुरूच आहे. परिवहन विभागातील फ्लाइंग स्क्वॉडच्या मदतीने ही कारवाई करण्यात येते.

मुंबई : शहर-उपनगरांसह राज्यात नियमबाह्य स्कूलव्हॅनवर कारवाई सुरूच आहे. परिवहन विभागातील फ्लाइंग स्क्वॉडच्या मदतीने ही कारवाई करण्यात येते. केवळ स्कूलव्हॅनवर कारवाई करत नसून, अवैध रिक्षा-टॅक्सींसह सर्व प्रकारच्या वाहनांवर योग्य आणि आवश्यक कारवाई नियमितपणे सुरू असल्याचा दावा परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी केला आहे.शाळेतील मुलांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या स्कूलव्हॅनबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी ‘रिअ‍ॅलिटी चेक’ करून, स्कूलव्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे भीषण वास्तव मांडले होते. विशेष म्हणजे, या रिअ‍ॅलिटी चेकअंतर्गत शहरातील माझगाव-नागपाडा-भायखळा अशा भागांमध्ये न्यायालयाच्या नियमांना धाब्यावर बसवून खुलेआमपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी राज्याच्या परिवहन आयुक्तांशी संपर्क साधला असता, ‘केवळ स्कूलव्हॅनवर कारवाई करण्यात येत नाही. स्कूलव्हॅनसह अन्य सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्यात येते,’ असे त्यांनी सांगितले. शहर-उपनगरांसह राज्यातील किती स्कूलव्हॅनवर कारवाई आणि कोणत्या प्रकारची कारवाई केली? याबाबत विचारले असता, ‘माहिती आणि आकडेवारी जमा करण्यात येत आहे. सर्व माहिती जमा झाल्यावर एकत्र करून माहिती देण्यात येईल,’ असा सावध पवित्रा परिवहन आयुक्तांनी घेतला.‘स्कूलव्हॅनवरील कारवाई सुरू असूनदेखील स्कूलव्हॅन वाढत असल्यास, संबंधित फ्लाइंग स्क्वॉड अधिकारी स्कूलव्हॅन चालक-मालक यांच्यात साटेलोटे आहे,’ असे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे (एसबीओए) अध्यक्ष अनिल गर्ग यांचे म्हणणे परिवहन आयुक्त चन्ने यांनी फेटाळले आहे. यामुळे स्कूलव्हॅनमधील जीवघेणी विद्यार्थी वाहतूक थांबणार तरी कधी? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

टॅग्स :शाळा