Join us

कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत कारवाईची लस, पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 4:09 AM

CoronaVirus News : दररोज किमान पाच जागांवर छापा टाकून नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई केली जाईल, तर लग्‍नाचे आयोजक, पालक व संबंधित व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहेत. 

मुंबई : काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार लग्‍न समारंभासाठीची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मीय स्‍थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी छापा टाकण्यात येईल. तिथे मास्‍कचा वापर होत नसेल व ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल. तसेच त्‍या-त्‍या आस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात येतील.

मुंबई पालिका आयुक्‍त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त यांच्‍यासह व्हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी आयुक्तांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. नियमितपणे तपासणी करण्याचे आदेश सर्व २४ सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात दररोज किमान पाच जागांवर छापा टाकून नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई केली जाईल, तर लग्‍नाचे आयोजक, पालक व संबंधित व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहेत. 

पहिला गुन्हा दाखलपवई चांदिवली येथील एव्हरेस्ट हाइटस या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर ते राहत असलेला मजला सील करण्यात आला.  तरीही त्या मजल्यावर राहणारी एक महिला नियमांचे उल्लंघन करून विनापरवानगी इमारतीबाहेर जात होती. याबाबत पालिकेकडे तक्रार आल्यानंतर गुरुवारी या महिलेवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

 विनामास्क फिरणाऱ्यांची आता खैर नाहीमुंबईत सध्‍या कार्यरत २,४०० मार्शल्सची संख्‍या वाढवून ४,८०० करण्यात येणार आहे. सध्‍या दररोज सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवर कारवाई केली जाते. यापुढे किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई होईल.रेल्वेमधून विनामास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्‍येकी शंभर असे एकूण ३०० मार्शल्‍स नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच पोलीसही आता मार्शल म्‍हणून नागरिकांकडून दंड वसूल करू शकतील.महापालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये, आदी‍ ठिकाणी पालिकेच्या शिक्षकांची नियुक्‍ती करून विनामास्‍क फिरणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.सर्वधर्मीय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे पालन होत असल्याची खात्री केली जाणार आहे.

पाचपेक्षा अधिक रुग्ण असल्यास इमारत सील

रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत  असलेल्या नव्या हॉटस्पॉटचे मॅपिंग करून तेथील जास्‍तीत जास्‍त चाचण्‍या केल्या जाणार आहेत. तसेच एका रुग्‍णामागे किमान १५ नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाच रुग्ण आढळून असल्यास आता संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.संसर्ग आटोक्यात येत असल्याने बाधित रुग्ण सापडलेला मजलाच सील करण्यात येत होता. मात्र पुन्हा इमारतींमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पाच रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय आयुक्त इकबालसिंह चहल यांनी गुरुवारी घेतला.

अशी राबविणार मोहीम झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरे घेऊन संशयितांची तपासणी केली जाणार आहे. तसेच मोबाइल व्‍हॅनच्या माध्‍यमातून रुग्‍ण शोधमोहीम सुरू ठेवून चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. प्रत्‍येक विभाग कार्यालयाच्‍या हद्दीमध्‍ये अतिजोखमीच्या व्‍यक्तिंसाठी कोरोना काळजी केंद्र-१ व लक्षणे नसलेल्‍या बाधितांसाठी केंद्र-२ असे प्रत्‍येकी किमान एक केंद्र सुरू ठेवणार. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई