Join us  

मिठी नदीसाठी कृती आराखडा

By admin | Published: April 12, 2017 3:11 AM

मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या संवर्धनासाठी कृती आराखड्याचे काम हाती घेतले असून, या कामात मिठी नदी प्रवाहित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या संवर्धनासाठी कृती आराखड्याचे काम हाती घेतले असून, या कामात मिठी नदी प्रवाहित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मिठीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने योजना आखली आहे. शिवाय नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर उपलब्ध झालेल्या मोकळ्या जागेवर सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित असून, याकरिता २०१७-१८साठी २५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.मिठी नदीसंदर्भातील विविध बाबींमध्ये लक्ष घालून नदीतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने अभ्यास गटाची नियुक्ती केली आहे. हा अभ्यास गट मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील मलनि:सारण वाहिन्यांच्या जाळ्याची उपलब्धता आणि पर्जन्य जलवाहिन्यामधून बिगर पावसाळी प्रवाह (ड्राय वेदर फ्लो) मलनि:सारण जाळ्यामध्ये वळवण्याची शक्यता इत्यादी बाबींचा अभ्यास करणार आहे. अभ्यास गटाने आवश्यक आढावा घेण्यासाठी सल्लागार नेमण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार, जानेवारीमध्ये महापालिकेने सहा महिन्यांच्या करार कालावधीसाठी सल्लागारांची नेमणूक केली आहे. सल्लागारांनी सुसाध्यता अहवालाचा मसुदा तयार केला असून, त्यामध्ये भरती आणि ओहोटी क्षेत्रानुसार अल्प आणि दीर्घ मुदतीची कामे करण्याबाबतची कृती योजना प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)फेब्रुवारी २०२०पर्यंत चालणार कामअल्प मुदतीच्या कामासाठी मे २०१७मध्ये निविदा मागविण्यात येतील. आॅक्टोबर २०१७पासून कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल. डिसेंबर २०१८पर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येतील. दीर्घ मुदतीच्या कामासाठी जुलै २०१७मध्ये निविदा मागवण्यात येतील. या कामांना नोव्हेंबर २०१७पासून सुरुवात होईल आणि फेब्रुवारी २०२०पर्यंत ही कामे पूर्ण होतील.- अल्प मुदतीच्या कामांमध्ये मिठी नदीच्या उगमापासून ३ किलोमीटर लांबीच्या बिगर पावसाळी प्रवाहाला पवई येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कार्यालयापर्यंत रोखता येईल. पवई येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या जागी प्रक्रिया करण्यासाठी वळवण्यात येईल आणि प्रक्रिया झाल्यानंतर, पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येईल. प्रक्रिया करणारदीर्घ मुदतीच्या कामांमध्ये ओहोटी प्रवण क्षेत्रातील बिगर पावसाळी प्रवाह (आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत) जवळच्या मलनि:सारण वाहिन्यांच्या जाळ्यामध्ये वळवण्याचे काम अंतर्भूत आहे. हा प्रवाह साकीनाका उदंचन केंद्रापर्यंत जाईल. साकीनाका उदंचन केंद्रामधून ४४ एमएलडी मलजल, पाणीपुरवठा प्रकल्पाच्या जागेवरील मलजल केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणण्यात येईल आणि त्यावर प्रक्रिया करून ते मिठीमध्ये सोडण्यात येईल.नदी प्रवाही राहाणारमिठी नदी प्रवाही राहण्यासाठी ही योजना प्रस्तावित आहे. भरती प्रवण क्षेत्रातील मलजलाचा प्रवाह जवळच्या मल:निसारण वाहिन्यांमध्ये वळवण्यात येईल, जो वांद्रे मलजल क्षेत्रात आणत वांद्रे/धारावी मलजल प्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रियेसाठी नेला जाईल.सुशोभीकरण म्हटले की, बऱ्याचदा नदीच्या दोन्ही बाजूस भिंती बांधल्या जातात, पण भिंती बांधल्यामुळे नदीची परिसंस्था नष्ट होते. नदी, त्यातील पाणी, आजूबाजूच्या वनस्पती, त्यातील प्राणी-पक्षी यांची मिळून परिसंस्था तयार होत असते. भिंतीमुळे ती नष्ट होते. उदाहरणार्थ, नदीच्या काठावर असणाऱ्या वनस्पती जलप्रदूषण कमी करत असतात. भिंतींमुळे आपण हे नैसर्गिक स्वच्छतादूत नष्ट करतो.- लक्ष्मीकांत देशपांडे, पर्यावरण अभ्यासक