प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा, मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनंतर उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:11 AM2017-09-15T07:11:25+5:302017-09-15T07:11:37+5:30
वाढत्या वाहतुकीच्या प्रदूषणाने मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. हवेतील धूलिकणांमध्ये वाढ करणारे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे.
मुंबई : वाढत्या वाहतुकीच्या प्रदूषणाने मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. हवेतील धूलिकणांमध्ये वाढ करणारे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र धूळमुक्त मुंबई, नवीन वाहनांच्या नोंदणीवर निर्बंध, समविषम फॉर्म्युला लागू करण्याचे महापालिकेचे प्रयत्न लटकले आहेत.
वायू व ध्वनिप्रदूषणात मुंबई भविष्यात दिल्लीलाही मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) कळविले होते. वायुप्रदूषण नियंत्रणाबाबत एमपीसीबीने सुचवलेल्या उपाययोजनांप्रमाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जैविक कचरा, पालापोचाळा, पिकांची खुंटे जाळून होणाºया प्रदूषणाचाही यात विचार करण्यात आला आहे.
प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना आखण्याची महापालिकेची ही पहिली वेळ नव्हे. २०११ मध्ये मुंबई धूळमुक्त करण्याची घोषणा शिवसेनेने केली. अर्थसंकल्पातही या मोहिमेचा समावेश करण्यात आला. परंतु या मोहिमेने वेग घेतलाच नाही.
नवी दिल्लीच्या धर्तीवर समविषम फॉर्म्युला लागू करणे व नव्या खासगी वाहनांच्या नोंदणीवर निर्बंध आणण्याचा पालिकेचा प्रस्ताव शासन दरबारी रखडला.
प्रदूषणामुळे आजाराला आमंत्रण
वाढलेल्या वाहतुकीच्या प्रदूषणामुळे हवेतील धूलिकणांमध्ये वाढ झाली असून हे धूलिकण आरोग्यास बाधक ठरत असतात. यामुळे दम्यासारखे श्वसन विकाराचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. तसेच त्वचेचे रोगही वाढत आहेत.
कृती आराखड्यात काय?
वाहनांमार्फत उत्सर्जित होणारे प्रदूषण नियंत्रित करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावून हरित पट्टा निर्माण करणे, जैविक कचरा, पालापाचोळा, पिकांची खुंटे जाळून होणाºया प्रदूषणाला आळा घालणे आदी उपाय या कृती आराखड्यात आहेत. हा कृती आराखडा मंजूर करण्यात आल्यानंतर याअंतर्गत ठोस उपाययोजान अमलात आणल्या जातील, असे पर्यावरण विभागाने काँग्रसेच्या माजी नगरसेविका संगीता हंडोरे यांच्या ठरावाच्या सूचनेवर असे स्पष्टीकरण दिले.
यापूर्वी सुचविलेले उपाय : मुंबईतील हवेत पोलेन, मोफेड, सोपर्स धूळ, सिमेंट धूळ इत्यादी धूलिकणांमुळे होणाºया वाढत्या प्रदूषणास आळा घालता येईल, अशा रीतीने संपूर्ण मुंबईत प्रदूषण नियंत्रके बसवण्याची मागणी प्रशासनाकडे होत आहे. गेल्या वर्षी महापालिकेने नवीन वाहने तसेच मोटारसायकलच्या नोंदणीवर बंदी अथवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाहनतळाची व्यवस्था असल्यास वाहनांची नोंदणी करू द्यावी तसेच वाहनांच्या या गर्दीसाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता.