लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेल्या धारावी, माहीम आणि दादर विभागातही आता रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. जानेवारी अखेरीस कोरोना मुक्तीच्या मार्गावर असलेल्या या विभागात दररोज सरासरी २० ते २५ बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. निर्जंतुकीकरण, जास्तीत जास्त चाचण्या आणि जनजागृती यावर भर देण्यात येणार आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्यामुळे १ फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा ठरवीक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी हॉटस्पॉट असलेल्या जी उत्तर विभागात कोरोनाचा प्रसार रोखण्यात महापालिकेला काही महिन्यांतच यश आले होते. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागाने कोरोनाचा प्रसार कशा प्रकारे रोखता येईल? याचा आदर्श जगापुढे ठेवला. मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सदैव गजबजलेल्या दादर विभागानेही अनेक उपाययोजनांनंतर कोरोनावर मात केली होती.
मात्र येथे पुन्हा बाधित रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विभागस्तरावर कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. धारावीतील झोपडपट्टी भागात, दादर-माहीममधील अधिक जोखीम असलेल्या क्षेत्रात फिरत्या वाहनामार्फत चाचण्या केल्या जात आहेत. तसेच येथील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक व इतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. जी/उत्तर विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन झिरो’ कार्यक्रम राबवला जात आहे. सतत हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर पाळणे गरजेचे असल्याने जनजागृती करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड चाचणी अनिवार्य आहे. दादर रेल्वेस्थानकावर गुजरात व इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोविडची लक्षणे असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करून बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात येत आहे.
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी/उत्तर
जी उत्तर विभागातील आजची स्थिती
परिसर...आजचे रुग्ण..एकूण बाधित..डिस्चार्ज...सक्रिय
दादर.... ०८.... ५०२३...४७५९....९८
धारावी... ०८....३९९९.... ३६६२... २१
माहीम.... ०७... ४८९२.... ११३.... ४६२५