आणीबाणीप्रसंगी वीज ग्राहकांना कृती योजना मदत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:09+5:302021-07-01T04:06:09+5:30

मुंबई : वीज ग्राहकांसाठी पावसाळ्यातील सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, वीज ग्राहकांच्या सुरक्षेसह आणीबाणीप्रसंगी वेळेत मदत पुरविता यावी ...

Action plans will help emergency power consumers | आणीबाणीप्रसंगी वीज ग्राहकांना कृती योजना मदत करणार

आणीबाणीप्रसंगी वीज ग्राहकांना कृती योजना मदत करणार

Next

मुंबई : वीज ग्राहकांसाठी पावसाळ्यातील सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, वीज ग्राहकांच्या सुरक्षेसह आणीबाणीप्रसंगी वेळेत मदत पुरविता यावी म्हणून कृती योजना आखली गेली आहे. पाणी साठणे, वीजपुरवठा खंडित होणे, विजेचा धक्का बसणे, ठिणग्या उडणे, आग लागणे यांसारख्या कोणत्याही घटना घडल्यास ग्राहकांची सुरक्षा अबाधित राखली जावी व मुंबईतील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळत राहावा यासाठी सर्व तयारी केली गेली आहे.

पावसाळ्यासाठी तयारी म्हणून हाती घेतलेल्या कृती योजनेत वितरण तसेच ग्राहक उपकेंद्रांमध्ये यंत्रे व उपकरणांची मान्सूनपूर्व तपासणी आणि बचावात्मक देखभाल करण्यात आली आहे. पाणी साठणे टाळण्यासाठी सर्व वितरण आणि उपकेंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात डिवॉटरिंग पम्प बसविण्यात आले आहेत. काही आणीबाणी उद्भवल्यास त्याचे तातडीने निवारण केले जावे यासाठी आवश्यक तयारीसह वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणत्याही आणीबाणीचा यशस्वी मुकाबला करता यावा यासाठी शहरात विविध ठिकाणी विशेष टीम्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आवश्यक सुटे भाग, ट्रान्सफॉर्मर्स, स्वीचगिअर्स यासारखी उपकरणे आणि यंत्रे यांचा पुरेसा साठा तयार ठेवण्यात आला आहे; जेणेकरून वीजपुरवठ्यामध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास तो कमीतकमी वेळेत दूर करता यावा. आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने मदत पोहोचविली जावी यासाठी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये विशेष व्यवस्था आहे. ॲपवर ग्राहक केवळ दोन क्लिक्स करून वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी त्यांना ग्राहक खाते क्रमांक लक्षात ठेवण्याचीदेखील गरज नाही, अशी माहिती टाटा पॉवर या वीज कंपनीकडून देण्यात आली.

----------------------

हे करा

• घराला, इमारतीला वीजपुरवठा करणाऱ्या मीटर केबिनमध्ये पाणी साठणार नाही किंवा तिथे पाण्याची गळती होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या.

• वायरिंगमध्ये काही बदल केले गेले असल्यास परवानाधारक इलेक्ट्रिकल कंत्राटदाराकडून त्याची नीट तपासणी केली गेलेली असावी.

• सर्व दुरुस्ती पूर्ण केली गेली आहे याची पूर्ण खात्री केल्यानंतरच मुख्य स्विच सुरू करावा.

• मीटर केबिनमध्ये पाणी साठत आहे किंवा पाण्याची गळती होत आहे हे लक्षात येताच तातडीने मुख्य स्विच बंद करा.

• ढग गरजणे, विजा चमकणे हे सुरू होण्याआधीच विजेची उपकरणे अनप्लग करा, अर्थात त्यांचे प्लग सॉकेटमधून बाजूला काढून ठेवा.

• ट्रॅफिकमध्ये असताना तुम्ही इतरांना ठळकपणे दिसावे यासाठी रिफ्लेक्टिव्ह रेनकोट्स वापरा.

----------------------

हे करू नका

• विजा चमकत असताना वायरला किंवा इमारतीच्या आतील प्लम्बिंगला स्पर्श करू नका, टेलिफोनच्या तारा / धातूचे पाइप वीज वाहक असू शकतात.

• सोसाट्याचा वारा, वादळ, विजा चमकणे, जोरदार पाऊस होत असताना झाडाखाली किंवा तात्पुरत्या बांधकामाखाली आडोशासाठी थांबू नका.

• विजेच्या तारा, उपकरणे, जोडणी यांना ओल्या हातांनी तसेच हातमोजे, सुरक्षा पादत्राणे किंवा वीजरोधक प्लॅटफॉर्म असल्याखेरीज स्पर्श करू नका.

• वेगाने वाहणाऱ्या पाण्यामध्ये चालू, पोहू नका, त्यात उतरू नका.

• विजेच्या ओव्हरहेड तारा / विजेचे खांब तसेच इतर यंत्रे, उपकरणांच्या जवळ पतंग उडवू नका.

• पावसाळ्यात पाण्याने भरलेली गटारे, ओढे, नदीनाले यांच्या जवळपास मुलांना खेळू देऊ नका.

• जोरदार पाऊस असताना डोंगरावर तसेच समुद्रकिनारी फिरण्यासाठी जाऊ नका.

Web Title: Action plans will help emergency power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.