भिवंडीला नल्ला रिक्षांवर कारवाई हवी
By admin | Published: January 13, 2015 12:34 AM2015-01-13T00:34:56+5:302015-01-13T00:34:56+5:30
शहर व ग्रामिण परिसरांत सुमारे विनापरवाना १० हजारापेक्षा जास्त नल्ला रिक्षा सुरू असून याकडे ठाणे परिवहन अधिकारी व स्थानिक शहर वाहतूक शाखा दुर्लक्ष करीत आहेत
भिवंडी : शहर व ग्रामिण परिसरांत सुमारे विनापरवाना १० हजारापेक्षा जास्त नल्ला रिक्षा सुरू असून याकडे ठाणे परिवहन अधिकारी व स्थानिक शहर वाहतूक शाखा दुर्लक्ष करीत आहेत. प्रवाशांची लूट करणाऱ्या नल्ला रिक्षांवर ठोस कारवाई करून त्यांचे उच्चाटन व्हावे, अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून होत आहे.
वाहतूक पोलीस शाखेमार्फत नुकताच रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आल. परंतु, प्रवाश्यांची सुरक्षा नसलेल्या व पासिंग न झालेल्या अवैधरित्या चालणाऱ्या नल्ला रिक्षांवर कारवाई होत नसेल तर हा सप्ताह म्हणजे फार्स ठरत आहे. अनेक वेळा ठाणे प्रादेशीक अधिकारी मुंबई-नाशिक महामार्गावर तर कधी कल्याण मार्गावर कोपऱ्यात उभे राहून मोठमोठ्या गाड्या अडवून त्यांची तपासणी करतात. परंतू भिवंडी शहरांत येण्यास त्यांना वेळ नसतो. स्थानिक शहर वहातूक पोलीस अशा अवैध रिक्षांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशीक परिवहन अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत असल्याने शहरांत अशा रिक्षांची गर्दी झाली आहे. तसेच अशा रिक्षा कल्याण-भिवंडी व भिवंडी-ठाणे मार्गावर धावून राजरोसपणे प्रवाशांची लूट करीत आहेत.
(प्रतिनिधी)