मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. संताप मोर्चावेळी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी राज ठाकरे यांनी रेल्वेला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिलं. राज ठाकरेंनी रेल्वेसोबत आता सर्वच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही आयुक्तांना सुचवल्या आहेत.
पंधरा दिवसांत मुंबईतील सर्व रेल्वे स्थानके, पादचारी पूल व गर्दीच्या वेळी बाहेर पडण्याच्या जागा या सगळ्या ठिकाणांहून फेरीवाले हटवा. रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चावेळी दिला होता.
२९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचा निषेध करण्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्टेशनदरम्यान संताप मोर्चा काढला. चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वे अधिका-यांची भेट घेतल्यानंतर राज यांनी मोर्चेक-यांना संबोधित केले. यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली. आजचा मोर्चा आम्ही शांततेत काढला, पण यापुढेही परिस्थिती हीच राहिली तर आम्ही शांत राहणार नाही, असे सांगत राज म्हणाले की, कधी खड्ड्यात, कधी पुलावर, रेल्वेखाली किड्यामुंग्यांसारखी माणसे मरताहेत व हे उच्चस्तरीय बैठका घेताहेत. इतक्या वर्षांनंतरही प्रश्न कसे सुटत नाहीत, असा सवाल राज यांनी केला.
बुलेट ट्रेनवरून राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. बुलेट ट्रेनमागे मुंबई बळकावण्याचा गुजरातचा डाव आहे. मूठभर गुजरात्यांसाठी सरकार एक लाख कोटींचे कर्ज काढणार आणि नंतर सगळा देश हे कर्ज फेडणार, असे सांगत मुंबईकरांना बुलेट ट्रेनची आवश्यकता नसल्याचे राज म्हणाले. बुलेट ट्रेनला विरोध केल्यामुळेच सुरेश प्रभू यांना मंत्रिपदावरून काढून टाकल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला होता.