मालाड- मालवणीत दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या दंगेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मालाडचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी केली आहे.
गुरुवारी राम नवमी मिरवणूूकी दरम्यान दोन गटांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अस्लम शेख बोलत होते.
याबाबत बोलताना अस्लम शेख पुढे म्हणाले, "देशातल्या विविध भागांमध्ये अशा स्वरुपाच्या घटना घडत आहेत.हे अत्यंत दुर्देवी आहे. या देशाची संस्कृती टिकली पाहिजे. सर्वांनी परस्परांच्या धर्माबद्दल आदराची भावना जोपासली पाहिजे. जे कोणी ऐकमेकांच्या धर्माला लक्ष करुन चुकीच्या घोषणा देत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे."
मालवणीत दंगल घडवू पाहणारे स्थानिक लोक नाहीत. बाहेरुन येऊन काहींनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा दंगेखोरांना शासन व्हावे यासाठी नवीन कायदा आणण्याची गरज असल्याचे शेख यांनी सांगितले.सतर्कता दाखवून मालवणीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस विभागाचेही त्यांनी कौतूक केले.