नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचा विरोध न जुमानता सिडकोने अतिक्रमणावरील कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी गोठीवली येथील इमारतीवरील कारवाईनंतर सिडकोच्या पथकाने आज घणसोलीतील दोन पाच मजली इमारतींवर बुलडोझर फिरविला. दरम्यान, या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी माजी महापौर सागर नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत व भाजपाचे युवा नेते वैभव नाईक यांच्यासह जवळपास ६० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी गोठीवली गावातील दोन इमारतींवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या कारवाईला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध करीत हिंसक आंदोलन केल्याने सिडकोची मोहीम थंडावेल, असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र ग्रामस्थांच्या अपेक्षा फोल ठरवित सिडकोने आज पुन्हा घणसोलीतील दोन बेकायदा इमारतींवर हातोडा मारला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजल्यापासून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. त्यामुळे या परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. कारवाईच्या निषेधार्थ घणसोली व गोठीवली परिसरातील सर्व दुकाने आज बंद ठेवण्यात आली होती. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना आजही सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात घणसोली गावातील संजय प्रभाकर पाटील हा युवक गंभीर जखमी झाला आहे. (प्रतिनिधी)सिडकोच्या कारवाईविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा प्रश्न रेंगाळला आहे. गावठाणाच्या सीमारेषा अद्याप निश्चित न झाल्याने कोणती बांधकामे अधिकृत व कोणती अनधिकृत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वप्रथम हा संभ्रम दूर करा, मगच कारवाईला या, असा इशारा भगत यांनी दिला आहे. पालकमंत्री, खासदारांची पाठच्सिडकोने मंगळवारपासून सुरू केलेल्या अतिक्रमणाविरोधातील कारवाईमुळे प्रकल्पग्रस्त धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांनी या कारवाईच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी यात उडी घेतली असली तरी जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदारांनी मात्र प्रकल्पग्रस्तांच्या या प्रश्नाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.सिडकोच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांची स्थगितीच्बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून निवेदन दिले. गावठाणांपासून २00 मीटरपर्यंच्या बांधकामांना अभय देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र सिडकोकडून या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे गावठाणाच्या सीमारेषा निश्चित होईपर्यंत सिडकोच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. पुढील निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिल्याची माहिती आमदार म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. च्कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी महापौर सागर नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मनोहर पाटील, मोहन म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पाटील, अंकुश सोनावणे आदींसह सुमारे ६० जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून संध्याकाळी सोडून दिले. सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे हे स्वत: घटनास्थळी उपस्थित होते.
कारवाईचा धडाका सुरूच!
By admin | Published: May 28, 2015 12:18 AM