रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई!
By admin | Published: July 3, 2014 02:55 AM2014-07-03T02:55:24+5:302014-07-03T02:55:24+5:30
कचराकुंडीव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी दोन उपद्रव शोध पथकांची निर्मिती करण्यात आली असून या पथकांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
नवी मुंबई : कचराकुंडीव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी दोन उपद्रव शोध पथकांची निर्मिती करण्यात आली असून या पथकांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कचरा टाकण्यासाठीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. कचराकुंडीत व कचरा टाकण्याच्या ठिकाणीच कचरा टाकावा असे अपेक्षित असते. परंतु अनेक नागरिक विशेषत: दुकानदार त्यांच्याकडील कचरा रोडवर जिथे जागा दिसेल तिथे टाकताना दिसत आहे. अनेक वेळा मटण विक्रेतेही जागा मिळेल तिथे कचरा टाकत असल्याचे निदर्शनास येते. पूर्वी ठेकेदाराच्या माध्यमातून परिमंडळनिहाय उपद्रव शोध पथक तयार करून कारवाई करण्यात येत होती. परंतु कचरा उचलण्याच्या ठेक्याची मुदत संपल्यापासून जवळपास दोन वर्षे ही पथके बंद होती. यामुळे कचरा टाकण्याविषयी बेशिस्तपणामध्ये वाढ झाली होती. यामुळे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या आदेशानुसार घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी पुन्हा दोन्ही परिमंडळमध्ये प्रत्येकी एक पथक सुरू केले आहे.
उपद्रव शोध पथकाला वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोन मार्शल, एक स्वच्छता निरीक्षकाचा यामध्ये समावेश असणार आहे. शहरात कचरा कुंडीव्यतिरिक्त कचरा टाकताना, थुंकताना आढळल्यास हे पथक कारवाई करणार आहे. पहिल्यांदा कचरा टाकताना आढळल्यास १०० रुपये व पुन्हा तीच व्यक्ती सापडल्यास अडीचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शहरात चांगल्या प्रकारे स्वच्छता राहावी यासाठी ही पथके तयार केली आहेत. (प्रतिनिधी)