मुंबई : शिवडी क्षयरोग रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीप्रकरणी महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी चौघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात तीन परिचारिका व एक आया आहे़ त्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेने गुरुवारी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले. कामगार युनियनने कर्मचाºयांच्या माध्यमातून राजकारण करू नये, असा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी पालिका सभागृहात टोला लगावला आहे. या प्रकरणी महापौरांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
चार दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त यांनी शिवडी क्षयरोग रुग्णालयात अचानक भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी लहान रुग्णांकडे लक्ष न देता परिचारिका वॉर्डमध्ये चहा पिताना दिसून आल्या. त्याप्रसंगी काही रुग्णांच्या तोंडातून रक्तही वाहत होते. मात्र तरीही वॉर्डमध्ये फिरणाºया वॉर्डबॉय आणि परिचारिकांनी लक्ष न देता याउलट उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळेस अतिरिक्त आयुक्त असल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.गुरुवारी दुपारी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी पालिकेच्या मुख्यालयात धडक दिली. बेशिस्त वर्तन, कामात हलगर्जीपणा करणे या कारणास्तव शुभदा परब, प्रीती सातवसे, रूपाली पवार या तीन परिचारिका व आया अंगुरा वाल्मीकी यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच, पालिका रुग्णालयांत बेजबाबदारपणा सहन करणार नसल्याचे कुंदन यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान, माजी महापौर शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी गुरुवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत परिचारिकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला़निलंबनाच्या कारवाईनंतर परिचारिकांनी गुरुवारी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. या वेळी अधिष्ठाता व संबंधित डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दिले.