मुंबई - केंद्र शासनाने औषधविक्री संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या मुंबई शहर-उपनगरातील ४१० किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई केली आहे, तर १२१ औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत. फार्मासिस्टची उपस्थिती नसणे, ग्राहकांना औषधांच्या खरेदीनंतर बिले न देणे, विना प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री, तसेच शेड्यूल एच १ या वर्गातील अति महत्त्वाच्या औषधांची विना प्रिस्क्रिप्शन सर्रास विक्री करणे, यासारख्या नियमांचे औषध विक्रेत्यांकडून उल्लंघन झाले आहे.या चुकीच्या गोष्टींमुळे औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याचा भंग होत असल्याचा ठपका ठेवून निलंबनासह परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मध्ये केलेल्या तपासणीनुसार, ४१० किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, तर २०८ किरकोळ औषध विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले, तर त्यापैकी ३८ परवाने रद्द करण्यात आले. घाऊक विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर ८१ परवाने रद्द केले आहेत, तसेच एक सौंदर्यप्रसाधन आणि एक होमिओपॅथी औषध उत्पादकाचे परवानेही रद्द केले आहेत. तपासणीतून ७४६ औषधांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. यातील दोन नमुने बनावट औषधांचे असल्याचे आढळले आहे. अप्रमाणित सापडलेल्या औषधांसंदर्भात एफडीएने सात खटले दाखल केल्याचे सांगितले.
वर्षभरात ४१० औषध विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:57 AM