Join us  

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दोन हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 7:31 AM

७ दिवसांची नोटीसही धाडणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सक्ती करूनही अद्याप काही दुकानदारांनी पाट्या बदललेल्या नाहीत. त्यामुळे अशा दुकानदारांविरोधात पालिकेने सोमवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. बेजबाबदार दुकानदारांना सात दिवसांची नोटीस पालिका धाडणार असून, प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.

दुकानावर मराठी पाट्या लावण्यासाठी पालिकेने ३० सप्टेंबरची मुदत दिली होती. मात्र, मुदत उलटूनही सुमारे दोन लाख दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेनेही आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. 

नियम काय सांगतो ?

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक आहे.

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात पालिका अधिकारी भेट देऊन संबंधित दुकानाचा फोटो काढतात. कारवाईसंदर्भात सात दिवसांची नोटीस बजावली जाते व त्यानंतर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला जातो, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. तसेच दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दोन हजाराचा दंड वसूल करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. (छाया : सुशील कदम) 

टॅग्स :मराठी