मुंबई : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक पद्धत फेल ठरल्यानंतर, आरोग्य खात्याने आता नामी शक्कल लढविली आहे. त्यानुसार, इमर्जन्सीच्या काळात रुग्णालयात डॉक्टर नसेल, तर रुग्ण थेट १०४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतील. तक्रारीनंतर लगेच डॉक्टर उपलब्ध होतील. सोबतच निष्क्रिय डॉक्टरवर कारवाईही केली जाईल, असा इशारा आरोग्य खात्याने दिला आहे. बुधवारपासून ही सुविधा राज्यात सुरू झाली.शवविच्छेदन तत्काळ करायचे आहे, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेला आहात, इमर्जन्सी आहे, महिलेची प्रसूती आहे, बाळ आजारी आहे आणि प्राथमिक किंवा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नाहीत, आरोग्याची सुविधा नाही, अशी कोणतीही तक्रार १०४ या टोल फ्री क्रमांकावर करता येईल. अवघ्या काही सेकंदांत संबंधित रुग्णालयामध्ये कोणाची ड्युटी आहे व ते सध्या कोठे आहेत, याची माहिती घेतली जाईल आणि संबंधित डॉक्टरला तातडीने रुग्णालयात पाठविले जाईल. या सेवेत डॉक्टरांनी कामचुकारपणा केला, तर तातडीने कारवाई केली जाईल.ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर असेल आणि त्याच्यामुळे गंभीर रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. - डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
वेळेत डॉक्टर उपलब्ध न झाल्यास कारवाई; आरोग्य खात्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:35 AM