मुंबई : मोफत जाहिरातबाजी करण्यासाठी महापालिकेमार्फत लावण्यात आलेल्या दिशादर्शकांवर पत्रके चिकटविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे आदेशच आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.मुंबईतील रस्ते व ठिकाणांची दिशा दर्शविणारे फलक महापालिकेमार्फत लावण्यात येत आहेत. मात्र, हे दिशादर्शक फुकट्या जाहिरातबाजांकरिता आयती संधी ठरू शकते. यापूर्वी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांचा असाच वापर झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. याबाबतचा आढावा आयुक्तांनी नुकताच घेतला. त्यानंतर प्रभागातील दिशादर्शक फलक लावण्याचा आढावा घेऊन याबाबतचा अहवाल आठवड्याभरात सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी उपायुक्तांना दिले आहेत.>पर्यटकांसाठी दिशादर्शक गरजेचेमुंबईचे पर्यटन धोरण तयार करण्यात येत आहे. त्यात पर्यटकांना व इतर नागरिकांना शहराची योग्य प्रकारे माहिती होण्यासाठी हे दिशादर्शक आणि माहिती फलक महत्त्वाची भूमिका बजाविणार आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील माहिती आणि दिशादर्शक फलक बसविण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर समन्वय करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
दिशादर्शकांवर पत्रके चिकटवल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 2:29 AM