आग प्रतिबंधक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 02:26 AM2018-09-22T02:26:06+5:302018-09-22T02:26:26+5:30
गच्चीवरील रेस्टॉरंटला गेल्या वर्षी परवानगी मिळाली. मात्र, या मोकळ्या जागेत अन्न शिजवून देऊ नये, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
मुंबई : गच्चीवरील रेस्टॉरंटला गेल्या वर्षी परवानगी मिळाली. मात्र, या मोकळ्या जागेत अन्न शिजवून देऊ नये, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत विभाग पातळीवर सुरू असलेल्या कारवाईत नियम मोडणाºया उपाहारगृहांचा परवाना रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. वांद्रे-खार येथील अशा चार बड्या उपाहारगृहांवर ही कारवाई होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या एच पश्चिम विभागाने संबंधित उपाहारगृहांना नोटीस बजावली आहे.
गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाउंड येथील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्टो पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाºया उपाहारगृहांची झाडाझडती घेऊन महापालिकेने कारवाई सुरू केली. या कारवाईअंतर्गत वांद्रे पश्चिम हिल रोड येथील खार पश्चिम येथील एम्प्रिसया इमारतीवरून चालविण्यात येणाºया २४ लाँज बार, अर्गिले रूफटॉप रेस्टो, वांद्रे लिंकिंग रोडवरील सुबुरबीया मॉल आणि वांद्रे पश्चिम हिल रोड येथील झाफरन रेस्टॉरंटलाही नोटीस पाठविली आहे.
>परवानाही रद्द करण्याची तरतूद
नियमांचे उल्लंघन करणाºया उपाहारगृहांनी पालिकेच्या नोटीसनंतरही आवश्यक बदल न केल्यास त्यांचा परवानाच थेट रद्द होणार आहे.
कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात नोटीस पाठवून हुक्का पार्लर, बेकायदा बांधकाम आणि टेरेसवर तंदूर आढळल्याने परवाना रद्द का करू नये, याचा जाब विचारला होता.
चौकशी समितीच्या शिफारशीनुसार तीन वेळा नियम मोडल्याचे आढळल्यास परवाना रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.