Join us

तंबाखू खाणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: June 06, 2016 1:42 AM

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. तंबाखूच्या व्यसनाचे गांभीर्य लक्षात घेत, जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून पश्चिम

मुंबई: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. तंबाखूच्या व्यसनाचे गांभीर्य लक्षात घेत, जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने एक विशेष अभियान राबविले होते. या महिनाभराच्या अभियानात १ हजार १६३ प्रवाशांना तंबाखूचे सेवन करताना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून २०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. या वसुलीतून परेला २ लाख ३२ हजार ६०० रुपयांची कमाई झाली. या अभियानाचे उद्घाटन पश्चिम रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक एस.के. पाठक यांच्या हस्ते झाले. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, कोचिंग डेपो आणि ईएमयू कारशेड या ठिकाणी इंडियन डेंटल असोसिएशन, तसेच सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे मुखाच्या कर्करोग तपासणीचे शिबिर भरवण्यात आले होते. मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांचे अनुरक्षण कर्मचारी, टीटीई, तसेच आरपीएफचे कॉन्स्टेबल अशा एकूण २२० कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवर तंबाखू सेवनविरोधात पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. विशेष अभियान पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाचे रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये सर्वेक्षण करून तंबाखूच्या व्यसनी प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात आली. मागील आठवड्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत १३८ प्रवाशांना आरपीएफच्या कारवाईला सामोरे जावे लागले. यातून २८ हजार रुपए दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.