मुंबई : लोकलमधून विनातिकीट प्रवासी आढळत असतानाच एसटीमधूनही सर्रासपणे अशा प्रकारचा प्रवास होत आहे. प्रवाशांप्रमाणेच एसटीचे अधिकारीही फुकट प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. शिवनेरी एसी बसमधून एसटीचे दोन अधिकारी विनातिकीट प्रवास करताना आढळल्याने त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात एस.टी. साबळे हे साहाय्यक वाहतूक अधीक्षक तर ए.पी. चोपडे हे भांडार अधिकारी म्हणून काम करतात. पुण्यात स्थायिक असलेले हे दोन्ही अधिकारी कामानिमित्त मुंबई-पुणे ये-जा करतात. मागील सोमवारी सकाळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी पुण्यातून शिवनेरी एसी बस पकडली. त्याच वेळी मंत्रालयाचे एक कर्मचारी मुंबईकडे येण्यासाठी या बसमध्ये चढले आणि त्यांना २८ क्रमांकाचे आसन देण्यात आले. एक किंवा दोन क्रमांकाचे आसन मिळणार का, अशी विचारणा त्यांनी वाहकाला केली. मात्र या दोन्ही सीट व्हीआयपींसाठी असून एसटीचे अधिकारी त्या आसनांवर बसल्याचे सांगितले.आम्हीही एसटीचे प्रवासी आहोत, मग आम्हाला अशी सुविधा का नाही, अशी विचारणा या कर्मचाऱ्यांकडून वाहकाला करण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली असता हे दोन्ही अधिकारी विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिली. यासंदर्भात रावते यांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर त्या दोन एसटीच्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. या दोन्ही अधिकाऱ्यांकडून तिकिटाच्या शुल्काच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारण्यात आल्याचे एसटीतील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एसटीच्या दोन फुकट्या अधिकाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: April 08, 2016 2:03 AM