नवी मुंबई : कोपरखैरणे हद्दीत दोन ठिकाणी चालणाऱ्या जुगाराच्या दोन अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये २५ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोपरखैरणे व बोनकोडे परिसरात जुगाराचे अड्डे चालवले जात असल्याची माहिती परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळालेली. त्यानुसार बुधवारी रात्री तेथे विशेष पथकासह कोपरखैरणे पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. कोपरखैरणे सेक्टर-५ येथील मयूर हॉटेलसमोरील इमारतीमध्ये हा जुगाराचा अड्डा चालवला जायचा. प्रभा नावाची स्थानिक व्यक्ती जुगाराचा अड्डा चालवायची. मात्र कारवाईची चाहुल लागताच तो फरार झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. या ठिकाणावरून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तसेच मांडणाऱ्या एकूण १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे १ लाख रुपये जुगाराची रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय पत्ते, खुर्च्या व इतर साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याचवेळी बोनकोडे सेक्टर - १२ येथेही छापा टाकून जुगाराच्या दुसऱ्या अड्ड्यावर कारवाई केली. मन्नू श्रीवास्तव या व्यक्तीकडून हा अड्डा चालवला जायचा. पोलिसांच्या छाप्यामध्ये तेथे जुगार खेळणाऱ्या १० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मन्नू यालाही अटक झाली आहे. त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांकडून दीड लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण २५ जणांना अटक करून अडीच लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
जुगाराच्या दोन अड्ड्यांवर कारवाई
By admin | Published: April 03, 2015 3:07 AM