कर थकविणाऱ्या २२८ मालमत्तांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:31 AM2020-01-02T03:31:22+5:302020-01-02T03:31:33+5:30
कोट्यवधी थकवले; भांडुप, गोरेगाव, अंधेरी आघाडीवर
मुंबई : उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या महसुलात यंदा घट झाली आहे. यामुळे लक्ष्य गाठण्यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधींचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तब्बल ५८१ कोटी ११ लाख रुपये थकविणाºया २२८ मालमत्तांवर कारवाईची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर आता निर्बंध असणार आहेत.
जकात कर रद्द झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेने मालमत्ता कराकडे लक्ष केंद्रित केले आहे. मात्र हजारो कोटींचा मालमता कर अनेक विवादात सापडला आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत वसूल झालेला मालमत्ता कर अन्य वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के कमी होता. याचा परिणाम पालिकेच्या अर्थसंकल्पावर व विकासकामांच्या तरतुदींवर होऊ शकतो. त्यामुळे कर निर्धारक आणि संकलक खात्याने थकबाकी वसूल करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंत २२८ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, खुली जागा, शासकीय, शैक्षणिक मालमत्तांचा समावेश आहे.
...तर मालमत्तांचा होणार लिलाव
मालमत्तांची देयके मिळाल्यानंतर ९० दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर न भरणाºया मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात येते. महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ताधारकास दिली जाते.
त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता व्यावसायिक स्वरूपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाते. त्यानंतर मालमत्ता अटकावणीची किंवा जप्तीची कारवाई केली जाते. त्यानंतरही कराचा भरणा न केल्यास मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते.
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताच मालमत्ता कर मोठ्या प्रमाणत थकविण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे अशा थकबाकीदारांवर मुंबई पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या या कर थकविणाºया मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही संबंधित मालमत्ताधारकांनी थकबाकी न दिल्यास मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
भांडुपमध्ये सर्वाधिक ७२ कोटींची थकबाकी
मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये सर्वाधिक म्हणजे ७२ कोटी ४२ लाखांची थकबाकी भांडुप विभागात असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले आहे.
भांडुपनंतर गोरेगाव, अंधेरी या विभागांत थकबाकी जास्त असल्याचे उघडकीस आले. गोरेगाव विभागात ७१ कोटी २४ लाख, अंधेरी विभागात ४६ कोटी ९८ लाख एवढी थकबाकी आहे.
उर्वरित २१ विभागांमध्ये ३९०.४७ कोटी एवढी थकबाकी आहे.
विभाग मालमत्ता थकबाकी
(रुपये, कोटींमध्ये)
शहर ७८ १३३.१६
पश्चिम ९० २५५.२८
पूर्व ६० १९२.६७