Join us

सायनमधील अनधिकृत मंदिरावर कारवाई

By admin | Published: November 18, 2016 4:29 AM

न्यायालयाच्या आदेशानंतर सायन कोळीवाडा येथील ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिरावर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली.

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर सायन कोळीवाडा येथील ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिरावर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. यावेळी काही रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला असता वडाळा टी.टी पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले.सायन-कोळीवाडयातील प्रतिक्षा नगर येथे हे ५६ वर्ष जुने ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिर होते. मंदिर जलवाहिनीवर उभारण्यात आले होते. तसेच पालिकेच्या दफ्तरी मंदिराची नोंद नव्हती. त्यामुळे हे मंदिर अनधिकृत असल्याने पंधरा दिवसापूर्वी पालिकेने मंदिर विश्वस्तांना मंदिर अनधिकृत असल्याची नोटीस बजावली होती. मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिर वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या एफ उत्तर विभागाकडून या ठिकाणी कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसरात भक्तांची जमवाजमव केली. परिणामी कारवाईवेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून वडाळा ट्रक टर्मिनस पोलीसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात महापालिकेने या अनधिकृत मंदिरावर हातोडा मारला. (प्रतिनिधी)