Join us  

नगरविकास खाते करणार कारवाई

By admin | Published: April 16, 2016 2:40 AM

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेल्या ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेल्या ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पालिकेने अपात्रेबाबत महिनाभरात कोणतीच कारवाई न केल्याने मुख्यमंत्र्यांच्या हाती असलेल्या नगरविकास खात्यानेच पुढाकार घेत या चारही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी ७ आॅक्टोबरला गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या चिठ्ठीत महापालिकेतील सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख होता. त्याआधारे या चौघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली होती. सव्वादोन महिने कारागृहात काढल्यानंतर आरोपपत्र दाखल झाल्यावर सर्वांची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. जामीन मिळाल्याचा दिलासा असतानाच नगरविकास खात्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या. मार्चमध्ये चारही नगरसेवकांना नोटिसा बजावल्या. बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर पालिकेच्या सभागृहात दोन तृतीयांश मतांनी अपात्रतेचा ठराव मंजूर झाला तरच त्यांचे पद रद्द होऊ शकणार होते. आदेश बजावून महिना उलटल्याने नगरविकास खात्याने अधिनिमय १९४९ च्या कलम १३ आणि इतर अनुषंगिक तरतुदींनुसार या नगरसेवकांना पदावरून दूर करण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)