मुंबई : उड्डाणपुलाखाली ज्या पार्किंग दिसत आहेत, त्यावर कारवाईस सुरुवात होणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी दिली केली. उड्डाणपुलाखाली बरेचसे पब्लिक पार्किंग लॉट्स अधिकृतरीत्या तयार झालेले होते. मात्र, लवकरच महापालिकेमार्फत काही काळासाठी मोफत उपलब्ध करून दिलेल्या जागांवर उड्डाणपुलाखालील पार्किंग हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
शहरात एकूण ३४ वाहतूक पोलीस ठाणे असून, त्यातील परळ, खेरवाडी, दादर अशा इतर महत्त्वाच्या उड्डाणपुलांखाली वाहतूक पोलीस चौकी उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यांचा उपयोग वाहतूक मार्गांवर काहीही समस्या किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी होत असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. ते म्हणाले की, राज्य शासनाने उड्डाणपुलाखाली काहीही नसावे, अशी भूमिका उच्च न्यायालयात मांडली होती. मात्र, कालांतराने शासनाने भूमिकेत बदल करत, आवश्यकतेनुसार पोलीस चौकी उभारण्यास शासकीय समितीने परवानगी दिलेली आहे.
ज्या उड्डाणपुलाखाली अद्याप पार्किंग किंवा भंगारमधील गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत, त्यांना वाहतूक विभागाने नोटीस बजावलेली आहे, तसेच संबंधित यंत्रणांना पार्किंग व गाड्या हलविण्यासाठी आवश्यक ती मदत पुरविण्याचे पत्रही पाठविलेले आहे.लवकरच उड्डाणपुलाखालील जागा मोकळा श्वास घेतील, असा वाहतूक विभागाचा प्रयत्न आहे.नियंत्रण ठेवण्यात मोलाची मदतउड्डाणपुलाखालील पोलीस चौक्या या मुख्य रस्त्यांवरील उड्डाणपुलाखाली आहेत. अर्थात, रस्त्याच्या मधोमध चौकी असल्याने अपघातस्थळी किंवा इच्छीत स्थळी तत्काळ पोहोचण्यास मदत होत आहे. या चौक्यांमुळे वेळेची बचत होत असून, महामार्गावर कोणतीही समस्या निर्माण झाल्यास, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या चौक्यांचा मोठा प्रमाणात फायदा होत आहे. एकंदरीत मुंबईतील प्रमुख मार्गांवर देखरेख ठेवत नियंत्रण ठेवण्यासाठी उड्डाणपुलाखालील चौकी मोलाची मदत करत आहेत.