Join us

शरद पवारांच्या सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 9:08 PM

जे कुणी जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे पडसाद शनिवारी राज्यभर उमटले. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर हल्ला केला. याठिकाणी चप्पला भिरकावण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. हे आंदोलन गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्यामुळेच झालं असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोर्टाने सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

मात्र शरद पवारांच्या घरावर हल्ला होणार याची माहिती माध्यमांना मिळाली परंतु पोलीस दलाला कळली नाही. त्यामुळे हे गृहखात्याचे अपयश आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, उच्च न्यायालयाचा निर्णयानंतर शुक्रवारी जी घटना घडली. ती दुर्देवी आहे. एसटी कर्मचारी शांतता राखावी. मी शरद पवारांना भेटलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो. पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलीस सुरक्षेत कुठे त्रुटी राहिल्या त्याचा तपास सुरू आहे. जे कुणी जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशी सुरू असल्याने सविस्तर बोलता येत नाही. परंतु सुरक्षेत ज्या त्रुटी राहिल्या त्या शोधून काढू असं त्यांनी सांगितले.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांची शांतता ठेवावी, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. एसटीच्या विलिनीकरणाची मागणी वगळता इतर सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. कुणाच्याही भडकवण्यामुळे अशाप्रकारे कृत्य करू नका. जयश्री पाटील यांनी शरद पवारांवर जे आरोप केले त्यात काही तथ्य नाही. लोकांसमोर राहण्यासाठी असे आरोप केले जातात. हे आरोप आम्ही फेटाळून लावतो. पोलीस योग्य प्रकारे तपास करत आहेत अशीही माहिती दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी दिली.

अशी घटना परत व्हायला नको – राज्यपाल

शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केला त्या घटनेवर स्वत: मुख्यमंत्री लक्ष देत आहे. तसेच शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला ते तसा हल्ला भविष्यात होणार नाही याची सरकारन खबरदारी घेण्यात यावी. स्वतः  शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे ही घटना परत व्हायला नको याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार देखील पुढे लक्ष देईल असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी म्हटलं आहे.

टॅग्स :दिलीप वळसे पाटीलशरद पवार