विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाई तीव्र होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 06:28 AM2020-09-13T06:28:24+5:302020-09-13T06:28:39+5:30
गणेशोत्सव काळात आवश्यक खबरदारी घेऊनही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली होती. परिणामी, १ सप्टेंबरपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
मुंबई : गेल्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. लॉकडाऊन खुले होत असल्याने लोकांचा सार्वजनिक वावर वाढल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे महापालिका आता विनामास्क फिरणाऱ्यांंवरील कारवाई तीव्र करणार असून यासाठी मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात आवश्यक खबरदारी घेऊनही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली होती. परिणामी, १ सप्टेंबरपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दररोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आता एक लाख ६४ हजारांवर पोहोचली असून ८०६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील रुग्णवाढीचा दैनंदिन दर १.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, सक्रिय रुग्णांचा आकडा २७ हजारांवर पोहोचला असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम मंगळवारपासून सुरू होत आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतही पालिकेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन लोकांचे तापमान आणि प्राणवायू तपासणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे अनिवार्य असल्याने प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘मार्शल’ची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. विनामास्क असणाºया व्यक्तीकडून दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
मास्क न वापरल्यास
दोनशे रुपये दंड...
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाºया व्यक्तीकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यास एप्रिल महिन्यापासून पालिकेने सुरुवात केली. मात्र दंडाची ही रक्कम अन्यायकारक असल्याची नाराजी व्यक्त होऊ लागली. त्यामुळे आता ही रक्कम कमी करून दोनशे रुपये करण्यात आली आहे.
दररोज १६ हजार चाचण्या...
दररोज होणाºया सरासरी ७५०० हजार चाचण्यांचे प्रमाण १२ हजारपर्यंत वाढविण्यात आल्यामुळेच कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून येत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. दररोज १६ हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. तसेच बाधित रुग्णांच्या जास्तीत जास्त क्लोज कॉण्टॅक्सची तपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांचे विलगीकरण केले जाणार आहे.
खबरदारी आवश्यक...
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने मुंबईसाठी, आपल्या कुटुंबासाठी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.