मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या अलिबाग येथील बेकायदेशीर बंगल्यावर लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. मोदी याच्या बंगल्याशिवाय अन्य बेकायदेशीर बंगल्यांवरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सरकारने न्यायालयाला या वेळी सांगितले.अलिबागमधील वर्सोणे, सासवणे, कोलगाव, डोकवडे इत्यादी गावांत सीआरझेडचे उल्लंघन करून बड्या व्यावसायिकांनी व बॉलीवूड अभिनेत्यांनी बंगले बांधले आहेत. या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी अलिबागचे सुरेंद्र धावले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अलिबागमधील किती बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली, याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी राज्य सरकारने न्यायालयाला माहिती दिली की, नीरव मोदीच्या बंगल्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया लवकरच होणार आहे.‘नीरव मोदीच्या बंगल्याशिवाय आणखी ५८ बंगल्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. तर ६१ बंगल्यांच्या मालकांनी दिवाणी न्यायालयातून या कारवाईवर स्थगिती आणली आहे. मात्र, ही स्थगिती उठविण्यासाठी सरकार पुढील कार्यवाही करेल,’ असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.सरकारी वकिलांच्या या आश्वासनाची दखल घेत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी ठेवली आहे.
अलिबाग येथील नीरव मोदीच्या बंगल्यावर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 5:24 AM