मनोहर कुंभेजकर
मुंबई : पालिकेच्या आर मध्य वॉर्ड मध्ये एकीकडे स्लम मध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात पालिका प्रशासनाला यश मिळाले असतांना,दुसरीकडे येथील इमारतींमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण 82 टक्के इतके आहे.पालिका जेव्हा स्लम मधील कोरोना रुग्णांची तपासणी करते तेव्हा आम्हाला कोरोनाचे रुग्ण कमी आढळतात मात्र इमारती मध्ये रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. पालिका प्रशासनाने खाजगी हॉस्पिटलला कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी परवानगी दिली आहे.
एकीकडे पालिकेच्या कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड शिल्लक असतांना दुसरीकडे खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड भरलेले असतात असे काहीसे चित्र या वॉर्ड मध्ये आहे.पालिका प्रशासनाने खाजगी हॉस्पिटलला कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी परवानगी दिली आहे.याचा तर दुरुपयोग होत नाही ना? खाजगी लॅबच्या तपासणीत तर काही गडबड आहे का,याची खातरजमा करण्यासाठी पालिका प्रशासन खाजगी लॅबचा रिपोर्ट आणि आमचा चाचणी रिपोर्ट यांची तुलना करणार आहोत.आम्हाला जर चाचणीत 4 ते 5 रुग्ण आढल्यास खाजगी लॅब तपासणीत 40 रुग्ण आढळतात.रोज स्लम मध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी मिळतं असतांना दुसरीकडे खाजगी लॅबच्या तपासणीत रोज इमारतीमध्ये 100 च्या आसपास कोरोना रुग्ण सापडतात. त्यामुळे खाजगी लॅबच्या रिपोर्ट अचूक असेल अशी शंका येत असल्याने आम्ही त्यांची अचानक तपासणी सुद्धा करणार आहोत. त्यामुळे जर खाजगी लॅब मुद्दाम चुकीचा रिपोर्ट देत असतील तर आणि जर खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये तफावत आढळल्यास त्यांच्यावर पालिका प्रशासन कायद्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
सुमारे तीन लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या बोरिवली पूर्व,पश्चिम व चारकोप असा भाग या वॉर्ड मध्ये मोडतो. आतापर्यंत याठिकाणी 3887 कोरोना रुग्णांपैकी 2013 रुग्ण बरे झाले,तर 160 रुग्णांचा मृत्यू झाला. आता ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 1714 आहे.स्लममध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण 736 इतके आहे,तर इमारतींमध्ये हे प्रमाण 1813 इतके आहे अशी माहिती त्यांनी दिली. आर मध्य वॉर्ड मध्ये पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची चेस द व्हायरस आणि झिरो मिशन या योजनांची या वॉर्ड मध्ये काटेकोरपणे अंमबजावणी करण्यात येत असून येथील कंटेन्मेंट झोनची संख्या कमी झाली आहे.पूर्वी 13 ते 14 स्लममध्ये असलेल्या कंटेन्मेंट झोनची संख्या आता 9 वर आली आहे,तर पूर्वी 915 इमारतींच्या कंटेन्मेंट झोनची संख्या आता 400 वर आली आहे.
चारकोप,गोराई,एक्सर,गोरसापाडा,आणि आता बाभईपाडा हे कोरोनाचे आता हॉटस्पॉट झाले असून येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल याकडे प्रशासनाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे अशी माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत आम्ही 40 वैद्यकीय शिबीर घेण्यात आले असून घरोघरी तपासणी, स्क्रिनिग तसेच संशयित 100 ते 200 रुग्णांची अँटीजन टेस्ट करणे आणि मिशन झिरोची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे यावर भर देण्यात आला आहे.400 जणांची स्क्रिनिग टेस्ट केल्यावर 4 ते 5 रुग्ण आढळतात. तर अँटीजन टेस्ट मध्ये 4 ते 6 कोरोना रुग्ण आढळतात अशी माहिती त्यांनी दिली.
इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता गेल्या आठवड्यापासून वन रूम किचन मध्ये विलगिकरणाला आता पालिका परवानगी देत नाही.कारण जर कोरोना रुग्ण एक असेल तर त्याची बाधा घरातील इतरांना होते.ज्यांच्याकडे टू रुम,थ्री रूम, फोर रूम असतील तर त्यांना घरात विलगी करणाला त्यांनी हमीपत्र दिल्यावर परवानगी दिली जाईल.तसेच जर एखाद्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्यास पाहिले तो मजला सील केला जात असे,आता संपूर्ण इमारत सील केली जाईल. त्या इमारतीच्या नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी ही अध्यक्ष व सचिवांवर सोपवण्यात आली आहे.तर सुरवातीला सॅनिटायझेशन तसेच रोज कचरा उचलण्याचे काम पालिका प्रशासन करणार आहे.तर सील केलेल्या इमारतीतील अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांनाच इमारतीबाहेर जाण्यास मुभा असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
गृहनिर्माण सोसायट्यांमधे वैद्यकीय शिबीर घेतले तर तेथील नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य मिळत नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाला फेडरेशनचे सहकार्य मिळावे आणि पालिकेची भूमिका समजावून सांगण्यासाठी आज हौसिंग सोसायटीच्या फेडरेशनची बैठक आयोजित केली अशी माहिती डॉ.भाग्यश्री कापसे यांनी शेवटी दिली.