‘त्या’ कुटुंबीयांवर चौकशीअंती होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:08 AM2021-08-18T04:08:52+5:302021-08-18T04:08:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वंशाच्या दिव्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या मुलीचा ८ वेळा गर्भपात करत तिचा छळ करणाऱ्या पतीसह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वंशाच्या दिव्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या मुलीचा ८ वेळा गर्भपात करत तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या लोकांवर लवकरच चौकशीअंती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दादर पोलीस तपास करत आहेत.
प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय नेहाचा (नावात बदल) २००७ मध्ये दादरच्या उच्च शिक्षित, प्रतिष्ठित वकिलासोबत विवाह झाला. सासू, सासरेही वकील असून नणंद डॉक्टर आहे. मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत समजताच वडिलांनाही धक्का बसला आहे. मुलीच्या सुखी संसारासाठी त्यांनीही सासरच्या मंडळीकडे हात जोडले. मात्र त्यांचाही अपमान करत घराबाहेर काढल्याचे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे.
भारतामध्ये बंदी असलेल्या उपचारासाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास ८ वेळा उपचारादरम्यान गर्भपात करण्यात आल्याचे नेहाने तक्रारीत म्हटले आहे. याच्याशी संबंधित कागदपत्रेही पोलिसांकडे देण्यात आली आहेत. त्यानुसार दादर पोलिसांनी वकील कुटुंबाविरुद्ध गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यासह हुंड्यासाठी छळ आणि अन्य कलमांतर्गत गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल असे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.