Join us

फोन न घेणाऱ्यांवर  होणार कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 7:21 AM

महापौरांनी वाॅर रूममधील कर्मचाऱ्यांना खडसावले 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाबत माहिती व खाटांची उपलब्धता याविषयी माहिती देण्यासाठी महापालिकेने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये वॉर रूम सुरू केले आहेत. मात्र काही ठिकाणी वॉर्ड वॉर रूमला संपर्क करूनही रुग्णांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, फोन उचलले जात नाहीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. याची गंभीर दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दहिसर येथील वॉर रूमला भेट देऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कोरोनाकाळात आलेला प्रत्येक दूरध्वनी हा उचललाच गेला पाहिजे. नागरिकांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी यावेळी दिला.अनेक ठिकाणी वॉर रूमकडून नागरिकांना प्रतिसाद मिळत नसल्याचे दैनिक ‘लोकमत’मध्ये रिॲलिटी चेकच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले होते. त्यानंतर महापौरांनी भांडूप येतील एस वॉर्डमधील वॉर रूमची पाहणी केली होती. त्यानंतर आता नागरिकांच्या तक्रारीनुसार दहिसरच्या आर उत्तर विभागातील कोविड वॉर रूमची पाहणी महापौरांनी  केली.

अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडतीnनागरिकांकडून आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी त्यांनी स्वतः आर उत्तर वॉर रूमला फोन केला. चारवेळा फोन केल्यावर त्यांचा फोन उचलला गेला. त्यांनी एका कोरोना रुग्णाचा नंबर दिला. मात्र, त्यानंतर वॉर रूमकडून त्यांना काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे महापौरांनी थेट या वॉर रूमला भेट देऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. nमहापौर असल्याचे सांगूनही मला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांना काय वागणूक देत असाल याची कल्पना येते. मुंबईकरांना अधिक त्रास देऊ नका. त्यांना सर्व सुविधा नीट मिळाल्या पाहिजे, असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. तसेच रुग्णांनी आपल्या आवडीनुसार रुग्णालयाची मागणी न करता ज्या ठिकाणी उपलब्ध होत असेल त्या ठिकाणी तातडीने उपचार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या