मुंबई : झारखंड असो वा देशात अन्यत्र कोठेही झुंडशाहीच्या (मॉब लिचिंग) घटना घडल्यास समाजकंटकांवर योग्य ती कारवाई केली जाईल, त्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशारा केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी दिला.हज हाउस आॅफ इंडियाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘भारत हे धर्मनिरपेक्ष राष्टÑ आहे. येथील बहुसंख्याक हिंदू समाज सहिष्णू आहे. त्यामुळेच अल्पसंख्याक समाज धार्मिक-सामाजिक विकासा च्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशावेळी काही जण हिंसाचार घडवित असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. तरबेज अन्सारीच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना योग्य ते शासन केले जाईल.मुस्लीम समाजाने नकारात्मक विचारधारा सोडून विकास, सौहार्द टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयएसआय, अतिरेक्यांचे देशातील नेटवर्क मोडून काढण्यासाठी ठाम उभे राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हज यात्रेसाठी ४ जुलैपासून विमानांचे उड्डाण; मुंबई, औरंगाबादमधून ५९ उड्डाणेसौदी अरेबिया येथे होत असलेल्या हज यात्रेसाठी भारतातून या वर्षी ४ जुलैपासून यात्रेकरू रवाना होणार असून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहितीही नक्वी यांनी दिली. ते म्हणाले, ‘या वर्षी देशभरातील ठिकठिकाणच्या २१ विमानतळांवरून ५०० विमाने पाठविली जाणार आहेत. महाराष्टÑातील भाविकांसाठी मुंबई व औरंगाबाद येथून एकूण ५९ विमाने रवाना होतील. १४ जुलैला मुंबईतील पहिली तुकडी प्रस्थान करेल. मक्का मदिना येथे ९ आॅगस्टला हज यात्रेच्या मुख्य विधीला सुरुवात होईल. त्यासाठी यंदा भारतातून दोन लाख यात्रेकरू सहभागी होणार असून त्यापैकी १ लाख ४० हजार हे हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने जाणार आहेत. तर उर्वरित प्रवासी हे खासगी टूर्सच्या वतीने जातील, असे नक्वी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘कसल्याही अनुदानाशिवाय हज यात्रेकरूंना पाठविा असून या वर्षी २,३४० महिला एकट्याने (बिना मेहरम) यात्रा करणार आहेत. ४ जुलैला दिल्ली, गया, गुवाहाटी, श्रीनगर येथून विमानांचे उड्डाण होणार आहे. मुंबईतून १४ जुलैपासून ५२ फ्लाईट्स तर औरंगाबाद येथून २२ जुलैपासून ७ विमानांचे उड्डाण केले जाणार आहे.