Join us  

चार पॅथॉलॉजिस्टवर होणार कारवाई

By admin | Published: March 21, 2016 2:14 AM

पॅथॉलॉजी लॅबमध्ये आलेल्या नमुन्यांची तपासणी करून डॉक्टरने अहवाल सही करून द्यावा, या नियमाचे उल्लंघन करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या चार बेकायदेशीर पॅथॉलॉजिस्टवर

मुंबई: पॅथॉलॉजी लॅबमध्ये आलेल्या नमुन्यांची तपासणी करून डॉक्टरने अहवाल सही करून द्यावा, या नियमाचे उल्लंघन करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या चार बेकायदेशीर पॅथॉलॉजिस्टवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उचलेला आहे. रविवारी झालेल्या सुनावणीत चारही पॅथॉलॉजिस्टवरील आरोप सिद्ध झाल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी सांगितले. ताप आला, खोकला अधिक काळ असेल, तर नक्की काय आजार आहे, याचे निदान करण्यासाठी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅबमधून रक्त, मूत्र, शरीरातील फ्लूएडच्या तपासण्या करण्यास सांगितले जाते. या पॅथॉलॉजी लॅबच्या अहवालानुसार, फॅमिली डॉक्टर अथवा स्पेशालिस्ट डॉक्टर आजाराचे निदान करतो आणि रुग्णांवर पुढील उपचार सुरू करतो. मात्र, हा अहवाल चुकल्यास रुग्णावर चुकीचे उपचार होऊन त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. राज्यात अशा प्रकारे बोगस पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट झाला आहे. यात काही एमडी पॅथॉलॉजी केलेल्या डॉक्टरांचा समावेश आहे. याला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट’ने परिषदेत या पॅथॉलॉजिस्टविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पॅथॉलॉजी हा वैद्यकीय व्यवसाय आहे. पॅथॉलॉजी अहवाल चुकल्यास रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या चार पॅथॉलॉजिस्टविरुद्ध परिषदेत तक्रार आली होती. त्यानुसार, त्यांची चौकशी करण्यात आली. एकच पॅथॉलॉजिस्ट एका वेळी १५ ते २० ठिकाणी अथवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी असणे शक्य नाही. तरीही या पॅथॉलॉजिस्टच्या सह्या अनेक पॅथॉलॉजी लॅबच्या अहवालावर दिसून आल्या, ही गोष्ट शक्य नाही. याचाच अर्थ, ते रुग्णांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर परिषदेतर्फे कारवाई करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होईल, हे अद्याप ठरलेले नाही, असे डॉ.टावरी यांनी स्पष्ट केले. या चार पॅथॉलॉजिस्टना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्या वेळी हे चारही पॅथॉलॉजिस्ट बेकायदेशीरीत्या पॅथॉलॉजीचा व्यवसाय करत असल्याचे स्पष्ट झाले. हे पॅथॉलॉजिस्ट अप्रशिक्षित व्यक्तींना लॅब चालवण्याला चालना देत असल्याचे स्पष्ट आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई होत आहे. (प्रतिनिधी)