मुंबई - कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ग्राहकाला पाणी दिले जाते; पण मुंबईतील काही हॉटेलमध्ये प्रत्येक ग्राहकाला बाटलीबंद पाण्याची सक्ती होत आहे. हाॅटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या ग्लासाच्या बदल्यात थेट पाण्याच्या बाटल्या ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. ग्राहकाला शुद्ध जेवण देण्याबरोबर शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी हॉटेलचालकाची असते. बाटलीबंद पाण्याची सक्ती होत असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बाटलीबंद पाण्याची सक्ती करू शकत नाही हाॅटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येत नाही, अशी सक्ती करण्यात येत असल्यास ग्राहकांनी हाॅटेल व्यावसायिकांनी शुद्ध व स्वच्छ पाणी देणे आवश्यक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
...तर ‘एफडीए’कडे तक्रार बाटलीबंद सक्तीचे प्रकार होत असल्यास ग्राहकांनी याबाबत ‘एफडीए’कडे तक्रार करणे गरजेचे आहे. शिवाय, ग्राहकांनी स्वतः जागरूक राहून हाॅटेल व्यावसायिकांकडे शुद्ध पाण्याची मागणी केली पाहिजे.
‘एफडीए’ची तपासणी‘एफडीए’कडून राज्यासह मुंबईत हाॅटेल्सची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे नियम पाळत नसल्यास हाॅटेल्सवर कारवाई केली आहे. आतापर्यंत २२ हाॅटेल्स बंद करण्यात आले असून २०० हून अधिक हाॅटेल्सला नोटीस पाठवली आहे.
हाॅटेलमध्ये ग्राहकांना अशा स्वरूपाची सक्ती करीत असल्यास त्यांनी वेळीच विरोध केला पाहिजे. तसेच, हाॅटेल व्यावसायिक अन्नसुरक्षा कायद्यानुसार अशा स्वरूपाची सक्ती करू शकत नाहीत. त्यामुळे मागील काही वर्षांत हाॅटेलमध्ये जाण्याचे प्रमाणही वाढले आहे, अशा स्थितीत ग्राहकांनीही अधिक जागरूक राहावे. बाटलीबंद पाण्याची सक्ती नको, तर शुद्ध आणि मोफत पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश अन्न व औषध विभागाने तपासणी मोहिमेदरम्यान दिला आहे.- शैलेश आढाव, सहआयुक्त (अन्न), एफडीए