Join us

इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास होणार कार्यवाही; ठेकेदाराची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येथील १४ हजार ७५५ पैकी नऊ हजार ४८ उपकरप्राप्त इमारतींचे (६८ टक्के) नियमित व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येथील १४ हजार ७५५ पैकी नऊ हजार ४८ उपकरप्राप्त इमारतींचे (६८ टक्के) नियमित व पावसाळापूर्व सर्वेक्षण झाले असून, आतापर्यंत एकही अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारत निदर्शनास आलेली नाही. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या चारही झोनमध्ये ठेकेदार नियुक्त केले असून, इमारतीच्या धोक्याची लक्षणे तसेच इमारत कोसळल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारामार्फत तात्काळ आपत्ती निवारणाबाबत कार्यवाही केली जाईल. नियंत्रण कक्षातील अधिकारी तात्काळ जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करतील.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित व पावसाळापूर्व सर्वेक्षण सुरू असून, मंडळातर्फे भाडेकरू/रहिवाशांची जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे.

* नियंत्रण कक्ष - ०२२ २३५३६९४५, ०२२ २३५१७४२३

* नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

दरवर्षी फेब्रुवारी, मार्च ते मे या कालावधीत उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपकरप्राप्त इमारतींत राहणाऱ्या भाडेकरू/रहिवासी, म्हाडा पॅनलवरील वास्तुशास्त्रज्ञ, म्हाडाने नेमलेल्या कंत्राटदारांना आवाहन करण्यात येत आहे की, उपकरप्राप्त इमारतीत काही धोकादायक स्थिती निर्माण झाल्यास किंवा संशय आल्यास म्हाडाच्या २४ तास कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षाशी तसेच संबंधित कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

- विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

* २०२० मध्ये १८ इमारती अतिधोकादायक

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे २०२० मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात १८ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या. या अतिधोकादायक १८ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या सात इमारतींचाही समावेश होता.

* स्ट्रक्चरल ऑडिट करा!

३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे. तीन वर्षांतून एकदा का होईना याबाबत कार्यवाही केली पाहिजे. त्यानंतर जो अहवाल येतो त्यानुसार इमारतीच्या डागडुजीला प्राधान्य दिले पाहिजे. महापालिकेची मदत घेतली पाहिजे. रहिवाशांनी सहकार्य केले पाहिजे. तरच आपण राहत असलेली इमारत व्यवस्थित राहील, असे तज्ज्ञांनी सांगितले.

* रहिवासी काळजी घेत नाहीत

कठोर नियम वापरले पाहिजे. पाणी कापले पाहिजे. लोकांना हलविले पाहिजे. मात्र महापालिका काही करत नाही. मग लोकही काळजी घेत नाहीत, अशी अवस्था आहे. महापालिकेच्या यादीत एक हजारांहून अधिक इमारती असतील. त्यांना महापालिकेने नोटीसदेखील दिली असेल. मात्र नोटीस देऊन महापालिका गप्प राहते. कारवाई करत नाही. कारवाई झाली तर लोक इमारतीची दुरुस्त करतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

* तज्ज्ञांच्या मते काय केले पाहिजे?

१. मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा समूह विकास केला पाहिजे.

२. अशा इमारतींचे सर्वेक्षण केले पाहिजे.

३. इमारतींचे ऑडिट केले पाहिजे.

४. सरकारकडे सगळ्या जुन्या इमारतीची नोंद असणे गरजेचे आहे.

५. महापालिकेकडे सगळ्या जुन्या इमारतींची नोंद असणे गरजेचे आहे.

६. अशा इमारतींचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

....................................