Join us

पादचाऱ्यांच्या अंगावर रंग, पाणी उडविल्यास होणार कारवाई; मुंबई पोलिसांचा इशारा

By मनीषा म्हात्रे | Published: March 22, 2024 5:47 PM

मुंबईतील गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजार पेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटिव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे.

मुंबई : मोठ्या उत्साहात साजर्‍या करण्यात आलेल्या होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शहरात कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत, शहरात जागोजागी नाकाबंदी करत संशयीत व्यक्ती, वस्तू आणि वाहनांची तपासणी सुरु आहे. तसेच, पोलिसांनी गस्तीवर भर दिलेला आहे. दुसरीकडे, सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी, रंग उडविणे आणि अश्लिल टीका टिप्पणी केल्यास थेट कारवाईचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. 

मुंबई पोलिसांच्या दिमतीला सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथके, जलद प्रतिसाद पथके, बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि वाहतूक पोलीसही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजार पेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटिव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. साध्या गणवेशातील पोलीसही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असणार आहे. दुसरीकडे निर्भया पथकाकडून गस्त सुरूच असून, काहीही मदत लागल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लिल बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. २३ मार्च ते २९ मार्च दरम्यान 

अश्लील टीका टिप्पणी, गाणे, तसेच अश्लील इशारे, फलकांचा वापर करू करू नये. पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे तसेच, रंगीत किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे फेकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाईल असे आदेश पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केले आहे. 

 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसहोळी 2024