Join us

गणवेश नाही अन् म्हणे मळकटलेले कपडे घालाल तर करू कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 8:31 AM

एसटीच्या चालक-वाहकांना गेल्या चार वर्षांपासून गणवेशच पुरविण्यात आले नाही.

मुंबई :

एसटीच्या चालक-वाहकांना गेल्या चार वर्षांपासून गणवेशच पुरविण्यात आले नाही. मग गणवेश घातला नाही म्हणून कारवाई कशी करता, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.

अनेक चालक-वाहक कर्तव्यावर असताना गणवेश घालत नाही तसेच काहीजण मद्यप्राशन करून गाडी चालवितात, असे प्रकार आढळून आले असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चालकाला मार्गावर जाण्यासाठी वाहन देताना त्याने मद्यप्राशन केले नाही याची तपासणी करून व तशी नोंद शेरावहीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे चालक-वाहक यांनी पूर्ण गणवेशात असणे आवश्यक आहे. पण तोही वेळेत द्या अशी मागणी होत आहे.

स्वताहून गणवेश शिवलाएसटी महामंडळातील  कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात येतो. मात्र अडीच वर्षात गणवेशच देण्यात आलेला नाही. काही कर्मचारी स्वतः कापड खरेदी करून गणवेश शिवून कामावर जातात. पॅन्ट वेगळ्या रंगाची आणि शर्ट पोशाखाच्या कापडाचा, असे चित्र  काही ठिकाणी दिसत आहे. शिवाय एकाच गणवेश असेल तर तो धुण्याचाही प्रश्न निर्माण होतो. 

गणवेश ही कर्मचाऱ्यांची शान आहे. त्यांनी कामगिरी गणवेशातच करायला पाहिजे. तसे आदेशही आहे. परंतु महामंडळाकडूनच गणवेश पुरविला जात नाही. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना नियमित आणि दर्जेदार गणवेश पुरवावा. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस

११,०० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटकाएसटी कर्मचाऱ्यांनी गणवेश घालून कामावर यावे, असा एसटी महामंडळाचा दंडक आहे. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना वर्षात दोन गणवेश किंवा कापड दिले जायचे. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून कापडही मिळाले नाही अन् गणवेशही नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुने गणवेश घालून किंवा स्वखर्चाने गणवेश घेऊन कामावर जावे लागते. मुंबई विभागात ११००हून अधिक कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

टॅग्स :एसटी संप